‘800’ या चित्रपटाच्या बायोपिकचे पोस्टर प्रदर्शित
वृत्तसंस्था/ चेन्नई
भारताचा माजी कर्णधार कपिल देव आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या आयुष्यावर बॉलिवूडमध्ये चित्रपट आलेले आहेत. त्यानंतर आता श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याच्या आयुष्यावरही एक चित्रपट येणार आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त बायोपिकचं पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले असून ‘800‘ असे मुरलीधरनवरील चित्रपटाचं नाव असणार आहे. स्लमडॉग मिलियनेरमधील प्रसिद्ध अभिनेता मधुर मित्तल हा मुरलीधरनच्या भूमिकेत दिसणार आहे.
श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुरलीधरन सोमवारी 51 वर्षाचा झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर बनवलेल्या बायोपिकचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. मुरलीवर बनत असलेल्या चित्रपटाचे नाव 800 असे आहे, जी त्याने कसोटी सामन्यात घेतलेल्या बळींची संख्या आहे. एम एस श्रीपती लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता मधुर मित्तल मुरलीधरनची भूमिका साकारत आहे. मुरलीधरनवरील चित्रपट सिंहली, हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
श्रीलंकेतील यादवी युद्धामध्ये मुरलीधरनने तत्कालीन श्रीलंकन सरकारला पाठिंबा दिला होता, त्यामुळे अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी त्याच्या भूमिकेत आणि त्याच्या चित्रपटात काम करण्यास असमर्थता दर्शवली होती. अनेक महिन्यांपासून मुरलीधरनच्या बायोपिकवर राजकीय वाद रंगला होता. परंतु अखेरीस चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असून त्याच्या आयुष्यातील संघर्ष आणि 800 विकेट्समागची स्टोरी प्रेक्षकांना पडद्यावर पाहता येणार आहे.मुथय्या मुरलीधरनच्या बायोपिकमध्ये काम करण्याची संधी मिळाली, याबाबत मी स्वत:ला भाग्यवान समजतो. लवकरच चित्रपटगृहात भेटू, असे अभिनेता मधुर मित्तल याने पोस्टर रिलीज करताना म्हटलं आहे.
प्रतिक्रिया
‘800’ हा चित्रपट केवळ मुरलीच्या क्रिकेट कारकिर्दीची कथा सांगत नाही, तर हा चित्रपट माणुसकीची देखील एक वेगळी कथा सांगतो.
एम. श्रीपती, दिग्दर्शक









