वृत्तसंस्था/ चेन्नई
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पुरुषांच्या हॉकी स्पर्धेचे यजमानपद पहिल्यांदाच भारताला मिळाले आहे. सदर स्पर्धा 3 ते 12 ऑगस्ट दरम्यान चेन्नईत होणार आहे. तब्बल 16 वर्षांनंतर चेन्नईमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी सामने पुन्हा पाहण्याची संधी शौकिनांना मिळणार आहे.
2011 साली पहिल्यांदा पुरुषांची आशियाई चॅम्पियन्स आंतरखंडीय हॉकी स्पर्धा भरविली गेली. आता सातवी आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा भारतात होणार आहे. दरम्यान, या स्पर्धेनंतर म्हणजेच येत्या सप्टेंबरमध्ये चीनमधील हेंगझोयु येथे आशियाई स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये पुन्हा आशिया खंडातील अव्वल हॉकी संघामध्ये सुवर्णपदकासाठी चुरस राहील. आशिया खंडामध्ये पाक हॉकी संघाने आतापर्यंत या स्पर्धेत आपले वर्चस्व राखले आहे. पाकच्या हॉकी संघाने आतापर्यंत तीनवेळा आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा जिंकली आहे. यावेळी सदर स्पर्धा चेन्नईतील मेयर राधाकृष्णन स्टेडियममध्ये आयोजित केली आहे. या स्पर्धेत चीनच्या सहभागाबाबत अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सदर माहिती तामिळनाडूचे क्रीडामंत्री स्टॅलिन यांनी दिली आहे.
2023 सालातील आशियाई चॅम्पियन्स करंडक पुरुषांची हॉकी स्पर्धा हिरो उद्योग समूहातर्फे पुरस्कृत राहणार आहे. यापूर्वी म्हणजेच 2007 साली चेन्नईत आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा भरविली गेली होती. 2007 साली झालेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने कोरियाचा 7-2 असा पराभव करून अजिंक्यपद मिळविले होते. चेन्नईत येत्या ऑगस्टमध्ये होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेतील पाक आणि चीनच्या सहभागाविषयी 25 एप्रिलपर्यंत मुदत राहील. आशियाई हॉकी फेडरेशनच्या संलग्न असलेल्या विविध देशांचे हॉकी संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. माजी विजेते दक्षिण कोरिया, मलेशिया, जपान यांचा समावेश आहे. भारतीय हॉकी संघाने सदर स्पर्धा 2011, 2016 आणि 2018 साली जिंकली होती. मात्र, 2018 साली भारत आणि पाक हे संयुक्त विजेते ठरले होते. दरम्यान, 2021 साली ढाका येथे झालेल्या या स्पर्धेत दक्षिण कोरियाने अजिंक्यपद मिळविले होते.









