खर्गेंच्या उपस्थितीत शेट्टरांचा काँग्रेसप्रवेश : लढत आता भाजपच्या टेंगिनकाई यांच्याशी
प्रतिनिधी, वार्ताहर/ बेंगळूर, हुबळी
भाजप नेत्यांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतलेल्या माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सोमवारी काँग्रेसचा ‘हात’ हाती घेतला. बेंगळूरमधील प्रदेश काँग्रेस कार्यालयात त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याचवेळी त्यांना पक्षाचा बी-फॉर्म देण्यात आला. 19 एप्रिल रोजी शेट्टर काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, भाजपनेही सोमवारी 10 उमेदवारांची घोषणा करताना हुबळी-धारवाड सेंट्रल मतदारसंघातून महेश टेंगिनकाई या स्थानिक लिंगायत नेत्याला उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता शेट्टर यांची लढत टेंगिनकाई यांच्याशी होणार आहे. उभयतांच्या लढतीत कोण बाजी मारणार हे 13 मे रोजीच स्पष्ट होईल.
सलग सहा वेळा हुबळी-धारवाड सेंट्रल मतदारसंघातून निवडून आलेल्या जगदीश शेट्टर यांना यावेळी भाजपने निवडणूक राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी तो झुगारून लावला. आपल्यालाच तिकीट द्यावे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न भाजपश्रेष्ठींनी केले. पण ते अयशस्वी झाले. अखेर रविवारी रात्री काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना पक्षातून तिकीट देण्याचे मान्य करण्यात आले. त्यांच्या काही अटीही काँग्रेसने मान्य केल्या. त्यानुसार सोमवारी सकाळी 8:30 वाजता मल्लिकार्जुन खर्गे यांनी शेट्टर यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. याप्रसंगी काँग्रेसचे सचिव के. सी. वेणूगोपाल, रणदीप सुरजेवाला, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, एम. बी. पाटील आदी उपस्थित होते.
अनेक नेते काँग्रेसमध्ये येणार : खर्गे
शेट्टर यांचे पक्षात स्वागत केल्यानंतर बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, शेट्टर यांच्याप्रमाणेच भाजपमधील अनेक नेते काँग्रेसमध्ये येणार आहेत. पक्षाची तत्वे मान्य करून शेट्टर आपल्या पक्षात आले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे उत्तर कर्नाटक भागात काँग्रेसला आणखी बळकटी प्राप्त होईल. शेट्टर हे साधे आणि सज्जन राजकारणी आहेत. ते संघ परिवारातून आले असले तरी त्यांनी कधीही कोणत्याही एका विशिष्ट समुदायाचा विरोध केलेला नाही, असे खर्गे म्हणाले.
राज्यात नवा अध्याय : सुरजेवाला
काँग्रेस राज्य प्रभारी रणदीप सुरजेवाला म्हणाले, राज्यात आता नवा अध्याय सुरू झाला आहे. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसच्या कुटुंबात प्रवेश केला आहे. त्यांचे पक्षात स्वागत आहे.
काँग्रेस 150 जागा जिंकणार : सिद्धरामय्या
जगदीश शेट्टर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षाला मोठी बळकटी प्राप्त झाली आहे. या विधानसभा निवडणुकीत पक्षाला 150 हून अधिक जागा मिळतील. कोणत्याही कारणाशिवाय वा आरोपांशिवाय भाजपने त्यांना तिकिटापासून वंचित ठेवले आहे. शेट्टर यांच्यासारखी वेळ कोणावरही येऊ नये, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.
आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळाली
भाजप पक्ष आता काही जण नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करत आहेत. वैयक्तिक हितासाठी ज्येष्ठांचा अपमान केला जात आहे. ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आलेली नाही. आपण भाजपमध्ये व्यक्ती म्हणून नव्हे; तर पक्ष महत्वाचा म्हणून काम केले. आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता काँग्रेस पक्षबांधणीसाठी काम करेन.
– जगदीश शेट्टर, माजी मुख्यमंत्री
कोण आहेत महेश टेंगिनकाई?
माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्याविरुद्ध भाजपने महेश टेंगिनकाई यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. टेंगिनकाई हे भाजपचे राष्ट्रीय संघटना सचिव बी. एल. संतोष यांचे निकटवर्तीय मानले जातात. 1989 मध्ये बूथ पातळीवरील कार्यकर्ता म्हणून टेंगिनकाई भाजपमध्ये सक्रिय झाले. त्यानंतर बूथ अध्यक्ष, वॉर्ड क्र. 42 चा अध्यक्ष, हुबळी शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष, हुबळी-धारवाड महानगर युवा मोर्चा उपाध्यक्ष, युवा मोर्चा राज्य उपाध्यक्ष, भाजपच्या राष्ट्रीय युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्य, हुबळी-धारवाड महानगर भाजप अध्यक्ष, धारवाड जिल्हा भाजप सहप्रभारी म्हणून जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. आता राज्य भाजपच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.









