वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत डॉ. शैली ओबेरॉय यांनी सोमवारी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला. आपल्याला पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल ओबेरॉय यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आभार मानले. आम आदमी पक्षाकडून शैली ओबेरॉय महापौर पदासाठी आणि आले मोहम्मद इक्बाल यांची उपमहापौर पदासाठी उमेदवार म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी दिली. आम्ही दिल्लीच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तसेच दिल्ली सरकारच्या मदतीने सर्वांगीण विकासासाठी सक्रीयपणे काम करू, असे डॉ. शैली ओबेरॉय म्हणाल्या. यावेळी सभागृह नेते मुकेश गोयल उपस्थित होते. संपूर्ण दिल्लीतील जनतेने आम्हाला प्रचंड बहुमत दिले आहे. अशा परिस्थितीत दिल्लीतील जनतेला आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आपल्याला दिल्लीला नव्या रूपात बघायचे आहे. आगामी काळात दिल्लीतील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.









