अटकेतील हल्लेखोरांना प्रतापगड कारागृहात हलवले
वृत्तसंस्था/प्रयागराज
अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी दोन एसआयटी स्थापन करण्यात आल्या आहेत. या दोन चौकशी पथकांपैकी पहिली टीम डीजीपी आर के विश्वकर्मा यांनी तर दुसरी टीम आयुक्त रमित शर्मा यांनी केली आहे. तत्पूर्वी, रविवारी सरकारने न्यायिक आयोगाची स्थापना केली. म्हणजेच आता या खून प्रकरणाचा तपास तीन स्तरांवर होणार आहे. दुसरीकडे, हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या असून हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे, प्रयागराज पोलीस अतिक-अशरफच्या तिन्ही मारेकऱ्यांना सुरक्षेच्या कारणास्तव नैनी कारागृहाऐवजी प्रतापगड जिल्हा कारागृहात हलवण्यात आले आहे.
माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची 15 एप्रिल रोजी रात्री 10.35 वाजता हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील हल्लेखोर अऊण मौर्य, सनी सिंग आणि लवलेश तिवारी यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत नैनी मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले होते. मात्र, अतिकचा मुलगा अली अहमद हा नैनी तुरुगात कैद आहे. अशा परिस्थितीत टोळीयुद्धाचा धोका लक्षात घेता अतिक-अशरफच्या मारेकऱ्यांना प्रतापगड कारागृहात हलवण्यात आले आहे.
अतिकच्या मुलाचा कारागृहात गोंधळ
गॅगस्टर अतिक अहमद याचा एक पुत्र अली हा सध्या अटकेत असून तो नैनी कारागृहात कैद आहे. कारागृहात तो गेल्या काही दिवसांपासून गोंधळ घालत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. अली गेल्या दोन दिवसांपासून सतत गोंधळ घालत आहे. रविवारी तो वडील अतिक यांच्या अंत्यविधीला जाण्याचा आग्रहही करत होता. मात्र परवानगी मिळाली नाही. सोमवारी दुपारी अली जोरजोरात रडू लागला. याचदरम्यान बॅरॅकच्या गेटवर डोके आदळून घेतल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. भाऊ असदच्या एन्काऊंटरपासून अली त्रस्त आहे. गेल्या तीन रात्री तो झोपलाही नाही. त्याने कारागृहातील जेवण खाण्यासही नकार दिला आहे.
प्रयागराजमध्ये तणावपूर्ण शांतता
अतिक-अशरफ यांच्या हत्येनंतर काही वेळातच कोल्विन हॉस्पिटल आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर पोलीस छावणीत बदलला आहे. या हत्याकांडानंतर संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू केले होते. याशिवाय इंटरनेट सेवा आणि एसएमएसवरही बंदी घालण्यात आली आहे. खबरदारी म्हणून प्रयागराजमध्ये जवळपासच्या जिह्यांमधून अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. सध्या पोलीस फौजफाटा कायम असून जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता पसरलेली दिसत आहे.
\









