अध्याय सविसावा
भगवंत उद्धवाला हरिकथेचे महत्त्व समजावून सांगत आहेत. ते म्हणाले, कथाकीर्तनाचे वाढत्या श्रद्धेने प्रतिपादन होऊ लागले म्हणजे विषयासक्ति बाधू शकत नाही आणि तेणेकरून साधकांना मत्परायणस्थिति प्राप्त होते म्हणजे ते सदैव माझ्याशी जोडले जातात. गीतेच्या नवव्या अध्यायात प्रेमाने ध्यास घेऊनी यजी मज नमी मज । असे जोडूनि आत्म्यास मिळसी मज मत्पर? 34? ह्या मी सांगितलेल्या वचनाचे ते तंतोतंत पालन करत असतात. भगवद्भक्तीच मुख्य आहे, असा विश्वास त्यांच्या मनामध्ये असल्याने ते कायम माझे आणि माझेच भजन करण्यात धन्यता मानतात. ज्याचा ध्यास त्याचा भास या न्यायाने, साहजिकच त्यांचा स्वभाव माझ्यासारखाच होतो. मी सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी वास करून आहे पण हे सर्वांना पटत नाही म्हणून त्यांच्या मनात भेदभाव निर्माण होतो परंतु ज्याचा स्वभाव माझ्यासारखाच झालेला असतो. त्याच्या सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी मीच आहे हे लक्षात आलेले असते. त्यामुळे त्यांच्या मनातला भेदभाव नष्ट होतो. ते सर्वाशी सारखेच वागतात. सर्वांच्या ठिकाणी मी आहे म्हणजेच जगात सर्वत्र मीच भरून राहिलेलो आहे अशी त्यांची खात्री होते आणि त्यामुळे माझ्या भक्तीशिवाय ते दुसरे काहीच करीत नाहीत. अशा रीतीने ते ‘मत्पर’ होतात. त्यामुळे त्यांचे माझ्याशी नाते जुळते. ज्यांचा स्वभाव माझ्यासारखाच झालेला आहे ते आहे त्या स्थितीत समाधानी राहतात कारण ते सर्व भरून पावलेले असल्याने त्यांना कुणाकडून कोणतीच अपेक्षा नसते. अशा भक्तांच्या ठिकाणी माझी चौथी भक्ती उत्पन्न होते. अनन्य भक्ताला आपोआपच माझे स्मरण होत असते. राधेची भक्ती अशीच अनन्य होती. कृष्ण गोकुळ सोडून निघून गेल्याला बरेच दिवस झाल्यावर तिच्या एका मैत्रिणीने तिला विचारले की, तुला कृष्णाची आठवण होते का नाही? त्यावर राधेने उत्तर दिले, जो आठवणीतून गेलेला असतो, त्याची आठवण करावी लागते. कृष्ण माझ्या कायमच स्मरणात असल्याने मला त्याची वेगळी आठवण काढावी लागत नाही. अनन्य भक्ताला आठवण न करताच अखंड हरीचे स्मरण होत असते. त्याने काय करायचे, काय करायचे नाही हे तो मुळीच ठरवत नाही कारण त्याला माहित असते की, त्याने जे काही करायचे आहे ते ईश्वरच ठरवत असतो. त्यानुसार त्याच्या हातून जी जी क्रिया घडते ती ती ईश्वरी इच्छेनुसारच घडत असल्याने त्या त्या क्रिया करत असताना त्याच्याकडून निरंतर भगवद्भजन सहजी घडत असते. तो डोळ्यांनी जे जे ‘दृश्य’ पाहतो, ते थोर असो की लहान असो, त्यात त्याला हरीचेच दर्शन होते. हेच अहेतुक व सहज भजन होय. तो जे जे बोलतो ते ते हरिचेच भाषण होते. म्हणून संतांच्या रचना ही देववाणी असते असे म्हणतात. तसेच वेद हा अपौरुषेय आहे असे म्हणतात त्यामागेही हेच कारण आहे. ते ज्या ऋषीमुनींच्या तोंडून बाहेर पडले तेव्हा ते ईश्वराशी एव्हढे अनन्य झालेले होते की, त्यांनी सांगितलेली वेद वचने हे ईश्वराचे मनोगत म्हणून स्वीकारली गेली. भक्त कसा हरिमय झालेला असतो हे सांगताना भगवंत म्हणाले, स्तुती करणारा, स्तुती आणि ज्याची स्तुती केली जात आहे तो ही त्रिपुटी नाहीशी होऊन तिघेही एकरूप होतात. त्यामुळे तो बोलतो ते हरिचेच बोल होतात. तसेच कानांनी जे ऐकतो ते सर्व हरिलाच अर्पण होत असते. नाकाची आणि सुवासाची गाठ पडली असता वास घेणारा हरिच असतो. ‘रस’, ‘रसना’ आणि ‘रसाभिरुचि’ यातही श्रीहरिच भोक्ता असतो. त्यामुळे भक्त परमानंदात डुंबत असतो. तो जेव्हा थंड, गरम, मऊ, कठीण पदार्थांना स्पर्श करतो तेव्हा हरिच त्या गोष्टीना स्पर्श करत असतो. त्यामुळे त्याला स्वत:ला थंड, गरम, मऊ, कठीण अशी पदार्थाच्या अवस्थेची कोणतीही जाणीव होत नाही. त्यामुळेच प्रल्हादाच्या पित्याने त्याला उकळत्या तेलात टाकले, अग्नीच्या स्वाधीन केले तरी त्याला कोणतीच झळ बसली नाही किंवा कड्यावरून ढकलून दिले तरी काहीही इजा झाली नाही.
क्रमश:








