सेन्सेक्स 520 अंकांनी प्रभावित, इन्फोसिसचे सर्वाधिक नुकसान
वृत्तसंस्था / मुंबई
आयटी क्षेत्रातील समभागांसह तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा जोर दिसल्याने सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजार घसरणीसह बंद झाल्याचे पहायला मिळाले. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिस सर्वाधिक नुकसानीत राहिली तर गेले नऊ दिवस तेजी राखून असणारा शेअरबाजार सोमवारी मात्र घसरणीसह बंद झाला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 520 अंकांनी घसरत 59,910 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांकसुद्धा 125 अंकांनी घसरत 17,706 अंकांवर बंद झाला. सोमवारी तेल आणि वायु, रिअल्टी, ऊर्जा आणि एफएमसीजी कंपन्यांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या व्यवहारामध्ये 2 हजार कोटींचा फायदा प्राप्त झाला. बीएसईवर मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.56 टक्के, 0.13 टक्के तेजीसह बंद झाले. आयटी आणि टेक समभागांमध्ये जोरदार विक्री दिसून आली. बाजारातील लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल सोमवारी 265.95 लाख कोटींवर पोहोचले होते. याआधी गुरुवारी 13 एप्रिल रोजी बाजारभांडवल 265.93 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच लिस्टेड कंपन्यांचे बाजारभांडवल सोमवारी 2 हजार कोटींनी वाढले आहे.
सेन्सेक्समधील 30 पैकी 18 समभाग तेजीसह बंद झाले. तर 12 नुकसानीत राहिले. नेस्ले इंडिया या कंपनीचे समभाग सर्वाधिक 4 टक्के इतके तेजी राखत बंद झाले. यानंतर पॉवरग्रीड कॉर्प, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभागसुद्धा 1 ते 2 टक्के इतके वाढत व्यवहार करत होते. इन्फोसिसचे समभाग सर्वाधिक 9 टक्के इतके घसरणीत राहिले होते. याच्यासोबत टेक महिंद्रा, एचसीएल टेक, लार्सेन टुब्रो, एनटीपीसी यांचे समभाग जवळपास 1.94 टक्के ते 5.23 टक्के घसरणीत राहिले आहेत. बँक निफ्टी निर्देशांक 130 अंकांनी वधारत 42,262 अंकांवर बंद झाल्याचे पहायला मिळाले.
जागतिक बाजारामध्ये अमेरिकेतील बाजार घसरणीत होते तर युरोपियन बाजारात काहीसा मिश्र कल दिसून आला. अमेरिकेतील डो जोन्सचा निर्देशांक 143 अंकांनी तर नॅसडॅकचा निर्देशांक 42 अंकांनी घसरणीत होता. आशियाई बाजारामध्ये बरेचसे निर्देशांक तेजी दर्शवित होते. यामध्ये निक्की 21 अंकांनी, स्ट्रेट टाईम्स 16, हँगसेंग 343, कोस्पी 4 आणि शांघाय काम्पोझिट 47 अंकांनी वधारत व्यवहार करत होता. जकार्ता काम्पोझिट मात्र नुकसानीत होता.