चीनकडून हाय अलर्ट जारी
वृत्तसंस्था/ तैपैई
चीनच्या भीषण युद्धाभ्यासानंतर आता अमेरिकेने देखील स्वतःची युद्धनौका ‘मिलियस’ तैवानच्या सामुद्रधुनीत पाठविली आहे. यामुळे चीन आणि अमेरिकेमधील तणाव वाढणार आहे. तैवान सामुद्रधुनीत अमेरिकेची युद्धनौका दिसून आल्याने चीनने ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. याप्रकरणी चीनकडून अमेरिकेला कठोर प्रतिक्रिया दिली जाणार असल्याचे मानले जात आहे.
अमेरिकेच्या नौदलाने तैवान सामुद्रधुनीच्या माध्यमातून एक युद्धनौका रवाना केली आहे. चीनने तैवानला चहुबाजूने घेरलेले असताना अमेरिकेची ही युद्धनौका तैवानच्या सामुद्रधुनीत पोहोचली आहे. तैवानच्या सामुद्रधुनीतून युद्धनौकेचा प्रवास सामान्य प्रक्रिया आहे. ही युद्धनौका कुठल्याही देशाच्या सागरी क्षेत्रातून जात नसल्याचे अमेरिकेच्या नौदलाकडून म्हटले गेले आहे.
चीन तैवाननजीक सातत्याने युद्धाभ्यास करत असल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. मागील 24 तासांमध्ये तैवाननजीक चीनची 18 सैन्यविमाने आणि 4 युद्धनौका दिसून आल्या आहेत अशी माहिती सोमवारी देण्यात आली.









