काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याबद्दल विरोधकांकडून सतत टीका होत असल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केला आहे. एकीकडे हनुमान चालीसा वाचायची आणि दुसरीकडे मशिदीत जाऊन कव्वाली ऐकयची अशा प्रकारचे हिंदुत्व आमचे नाही. आमचे हिंदुत्व दिखावू नसून देशासाठी प्राण पणाला लावणारे हिंदुत्व आहे. असे उद्धव ठाकरे यांनी नागपूरातील महाविकास आघाडीच्या वज्रमुठ रॅलीत सांगितले.
यावेळी जनसमुदायाला संबोधित करताना ते म्हणाले, “लोक एकीकडे हनुमान चालीसा वाचतात आणि दुसरीकडे मशिदीत जाऊन कव्वाली ऐकतात, हेच त्यांचे हिंदुत्व आहे का? तसेच यूपीमध्ये उर्दूमध्ये ‘मन की बात’ करतात, हे त्यांचे हिंदुत्व आहे का? देशासाठी प्राण अर्पण करणे हेच आमचे हिंदुत्व.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “प्रत्येक वेळी माझ्यावर आरोप होतो की मी काँग्रेससोबत गेल्यामुळे आणि हिंदुत्व सोडले. मला विरोधकांना विचारायचे आहे कि काँग्रेसमध्ये हिंदू नाहीत का? आरएसएस आणि भाजपचे हिंदुत्व हे ‘गौमुत्रधारी हिंदुत्व’ आहे. आम्ही ज्या संभाजीनगरमध्ये आमची जाहीर सभा घेतली त्या ठिकाणी त्यांनी गोमूत्र शिंपडले. त्यांनी थोडे गोमूत्र प्यायला हवे कारण त्यामुळे त्यांना शहाणपण झाले असते, आमचे हिंदुत्व राष्ट्रवादाचे आहे.” ” असा चौफेर टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
राज्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली असा आरोप करून त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, “राज्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला त्यामुळे शेतकरी हताश झाला आहे, परंतु राज्याचे मुख्यमंत्री अयोध्येला दर्शनासाठी गेले आहेत.” केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकार लोकशाहीच्या मूल्याची हत्या करत असून भारतीय जनता पक्षासाठी लोकशाही म्हणजे त्यांच्या जवळच्या साथीदारांना मदत करणे होय असे म्हटले आहे.