आयपीएल 16 : केकेआरवर 5 गड्यांनी मात, इशानचे अर्धशतक, सूर्या-तिलकची फटकेबाजी वेंकटेश अय्यरचे वेगवान शतक वाया
वृत्तसंस्था/ मुंबई
सलामीवीर इशान किशनने नोंदवलेले फटकेबाज अर्धशतक, हंगामी कर्णधार सूर्यकुमार यादवने फॉर्म मिळाल्यानंतर केलेली फटकेबाजी, तिलक वर्माचे उपयुक्त योगदान यांच्या बळावर मुंबई इंडियन्सने आयपीएलमधील दुसरा विजय नोंदवताना कोलकाता नाईट रायडर्सवर 5 गड्यांनी मात केली. केकेआरच्या वेंकटेश अय्यरने नोंदवलेले या मोसमातील सर्वात वेगवान शतक वाया गेले. मात्र तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
मुंबई इंडियन्सकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर केकेआरने वेंकटेश अय्यरच्या वेगवान शतकामुळे निर्धारित 20 षटकांत 6 बाद 185 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. अय्यरने 49 चेंडूत शतक नोंदवत हॅरी ब्रुकला मागे टाकले. ब्रुकने दोनच दिवसापूर्वी 55 चेंडूत शतक नोंदवले होते. अय्यरने 51 चेंडूत 104 धावा फटकावल्या. त्यानंतर मुंबईने 17.4 षटकांत 5 बाद 186 धावा जमवित 14 चेंडू बाकी ठेवत सहज विजय मिळविला. वानखेडे स्टेडियमवरील केकेआरचा हा दहा सामन्यातील नववा आणि मुंबईविरुद्ध झालेल्या एकूण 32 सामन्यातील 23 वा पराभव आहे.
किशनची फटकेबाजी
मुंबईच्या फलंदाजांनी केकेआरच्या आव्हानाचा पाठलाग करताना जोरदार सुरुवात केली. रोहितच्या गैरहजेरीत सूर्यकुमारने मुंबईचे नेतृत्व केले. पण फलंदाजी करताना रोहित इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात फलंदाजीस उतरला. केकेआरनेही वेंकटेश अय्यरच्या जागी सुयश शर्माला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून घेतले. रोहितपेक्षा इशान किशन जास्त आक्रमक होता. रोहित 20 धावा काढून बाद झाला. सूर्यकुमारला फॉर्म गवसल्यानंतर त्याने 25 चेंडूत 43 धावा फटकावल्या. त्यात 4 चौकार, 3 षटकारांचा समावेश होता. याशिवाय तिलक वर्मानेही 25 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 30 धावा फटकावल्या. विजयी फटका मारणाऱ्या टिम डेव्हिडने 13 चेंडूत नाबाद 24 जमवित मुंबईला सलग दुसरा विजय मिळवून दिला.
रोहित शर्मा व किशन यांनी मुंबईला जोरदार सुरुवात करून देताना 4.5 षटकांतच 65 धावांची सलामी दिली. उमेश यादवने अप्रतिम झेल टिपत रोहितला माघारी धाडले. त्याने 13 चेंडूत 2 षटकार, 1 चौकार मारला. इशानने 21 चेंडूत अर्धशतक पूर्ण करताना 5 चौकार, 4 षटकार मारले. वरुण चक्रवर्तीने त्रिफळा उडवून त्याची खेळी संपुष्टात आणली. 25 चेंडूत त्याने 5 चौकार, 5 षटकारांसह 58 धावा झोडपल्या. नवोदित लेगस्पिनर सुयश शर्माने तिलक वर्माला बाद करीत पहिला बळी टिपला. त्याने सूर्यकुमारसह तिसऱ्या गड्यासाठी 38 चेंडूत 60 धावांची भर घातली.
अय्यरचे वैयक्तिक पहिले शतक
तत्पूर्वी, वेंकटेश अय्यरने आयपीएलमधील पहिले शतक नोंदवल्यामुळे केकेआरला 185 धावांपर्यंत मजल मारता आली. त्याने एकाकी लढत देत शतकी मजल मारली. विशेष म्हणजे डावाच्या सुरुवातीला त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे धावा घेताना त्याला लंगडावे लागत होते. पण वेदना कमी झाल्यानंतर त्याने सहजतेने फलंदाजी केली. आयपीएलमधील त्याचे हे पहिलेच शतक आहे. त्याने गुरबाजसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 48, शार्दुल ठाकुरसमवेत चौथ्या गड्यासाठी 50 आणि रिंकू सिंगसमवेत पाचव्या गड्यासाठी 36 धावांची भागीदारी केली. गुरबाजने 8, शार्दुल ठाकुरने 13, रिंकू सिंगने 18, आंद्रे रसेलने नाबाद 21 धावा केल्या. कर्णधार नितीश राणा केवळ 5 धावा काढू शकला. शोकीनने राणाला बाद केल्यानंतर या दोघांत शाब्दिक चकमक झडली. सूर्यकुमार यादव व अन्य खेळाडूंनी त्यांना रोखले. दिल्ली रणजी संघातून एकत्र खेळणाऱ्या या दोघांत बऱ्याच काळापासून वाद आहे. ड्रेंसिंगरूममध्येही ते एकमेकांशी बोलत नाहीत. शोकीनने या सामन्यात 2 तर ग्रीन, डुआन जान्सेन, चावला व मेरेडिथ यांनी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक : कोलकाता नाईट रायडर्स 20 षटकांत 5 बाद 185 : गुरबाज 8, जगदीशन 0, वेंकटेश अय्यर 104 (51 चेंडूत 6 चौकार, 9 षटकार), नितीश राणा 5, शार्दुल ठाकुर 13 (11 चेंडूत 1 चौकार), रिंकू सिंग 18 (18 चेंडूत 2 चौकार), रसेल नाबाद 21 (11 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), सुनील नरेन नाबाद 2, अवांतर 14. गोलंदाजी : रितिक शोकीन 2-34, चावला 1-19, तेंडुलकर 0-17, ग्रीन 1-20, जान्सेन 1-53, मेरेडिथ 1-40.
मुंबई इंडियन्स 17.4 षटकांत 5 बाद 186 : रोहित शर्मा 20 (13 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), इशान किशन 58 (25 चेंडूत 5 चौकार, 5 षटकार), सूर्यकुमार यादव 43 (25 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), तिलक वर्मा 30 (25 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), टिम डेव्हिड नाबाद 24 (13 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), नेहाल वढेरा 6, ग्रीन नाबाद 1, अवांतर 4. गोलंदाजी : सुयश शर्मा 2-27, शार्दुल ठाकुर 1-25, वरुण चक्रवर्ती 1-38, फर्ग्युसन 1-19.