अभिनेत्री नेहा शर्मा मुख्य भूमिकेत
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यावरून चर्चेत आहे. पत्नी आलियासोबत त्याचा न्यायालयीन वाद सुरू आहे. यादरम्यान नवाजुद्दीनचा आगामी चित्रपट ‘जोगीरा सारा रारा’चे पोस्टर सादर करण्यात आले आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन आकर्षक लुकमध्ये दिसून येत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत नेहा शर्मा दिसून येणार आहे.

पोस्टरमध्ये नवाजुद्दीन स्वॅग दाखविताना दिसून येत आहे. नवाजुद्दीनचा हा चित्रपट 12 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुशान नंदी यांनी केले आहे. या चित्रपटाची कहाणी गालिब असद भोपाली यांची आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी धाटणीचा चित्रपट असून यात संजय मिश्रा आणि महाक्षय चक्रवर्तीसारखे कलाकारही दिसून येतील. महाक्षय हा सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांचा पुत्र आहे.
महाक्षयने इन्स्टाग्रावर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हास्याच्या मेजवानीसाठी सज्ज व्हा, जोगीरा सारा रारा हा चित्रपट 12 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे महाक्षयने स्वतःच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. नवाजुद्दीन या चित्रपटाद्वारे दीर्घकाळानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर नेहा शर्मा देखील मागील काही काळापासून चित्रपटांमध्ये दिसून आली नव्हती. तिच्यासाठी हा चित्रपट स्वतःचे स्थान निर्माण करण्याची संधी ठरणार आहे.









