गारगोटी; प्रतिनिधी
मडिलगे बुद्रुक ता.भुदरगड येथे मोटारसायकलने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रावसो केशव देसाई, (वय ७४, रा. मडिलगे बुद्रुक , ता.भुदरगड जि. कोल्हापूर)असे त्यांचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रावसो देसाई हे गुरूवारी (दि.१३)रोजी दुपारी बाराच्या सुमारास कामानिमित्त घरातून गावात येत होते.ते रस्त्याच्या एका बाजूने जात होते.त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मोटरसायकल चालकाने त्यांना पाठीमागून धडक दिली.धडक बसताच ते रस्त्यावर कोसळले.त्यामध्ये त्यांच्या डोकीला जबर मार बसला होता.उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी (दि १४)रोजी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद कोल्हापूर येथे नोंद झाली आहे.
ते जगदंबा विकास सेवा संस्थेचे माजी संचालक आहेत.त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, पुतने, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता आहे. अत्यंत शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे असलेल्या रावसो देसाई यांच्या अपघाती निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.









