सरवडे प्रतिनिधी
येथील राजेंद्र तुकाराम पोवार (वय ५१ )या शेतकऱ्याचा विहिरीत पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची नोंद राधानगरी पोलिसांमध्ये झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, राजेंद्र पोवार हे नेहमीप्रमाणे सकाळी पत्नी सोबत शेताकडे गेले होते. शेतातील कामे आटोपल्यानंतर त्यांच्या पत्नी घराकडे गेल्या. तर ते जनावरांना पाणी आणण्यासाठी शेताजवळील विहीरीवर गेले होते.विहीरीतून पाणी काढताना त्यांचा पाय घसरून ते पाण्यात पडले.परंतु त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी त्यांच्या पत्नी घरी गेल्या होत्या बराच वेळ पती घरी न आल्याने चौकशीसाठी नातेवाईकांना कल्पना दिली. शोधाशोध केली असता विहीरीमध्ये घागर व टोपी तरंगताना दिसली.त्यावरून त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त झाली. दरम्यान गावातील तरुणांनी पाण्यात उतरून शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला.शवविच्छेदन सोळांकुर ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले.शांत व गरीब स्वभावाच्या या शेतकऱ्याच्या मृत्युने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ भावजय, पुतणे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन सोमवारी आहे.









