पुणे / प्रतिनिधी :
काँग्रेस नेत्या शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांच्या तोंडी टाकलेले विधान चुकीचे आहे. संबंधित विधान ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात दाखवूनच द्या, असे थेट आव्हान सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी येथे दिले.
सावरकर म्हणायचे की, बलात्कार हे राजकीय हत्यार आहे, ते आपल्या विरोधकांच्या विरोधात वापरा, असे विधान काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे काँग्रेस आणि भाजपात पुन्हा शाब्दिक युद्ध रंगले आहे. भाजपा नेत्यांनी या विधानावरून वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनीही शिवानी वडेट्टीवार यांच्यावर शनिवारी पलटवार केला.
शिवानी वडेट्टीवार यांनी केलेले विधान अत्यंत चुकीचे आहे. सावरकरांनी असे कुठलेही वाक्य ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात लिहिलेले नाही. मी कुठेही हे वाचलेले नाही. त्यांनी ते विधान मला दाखवावे. या मुद्दय़ावर मुद्दाम टार्गेट केले जात आहे. एकतर त्यांनी अभ्यास केलेला नाही. पूर्ण वाचलेले नाही. त्यांचे सल्लागार मंडळ यांना सांगते, ते ही मंडळी बोलतात. मात्र, हे स्वतः पडताळूनही पाहत नाहीत, असा टोलाही सात्यकी सावरकर यांनी लगावला आहे.
सावरकर हिंदुत्ववादी नेते होते. आज देशात, महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार असून, सावरकरांच्या विचारांच्या जवळ जाणारे आहे. यांची सत्ता गेलेली आहे. ती सत्ता कोणाचे तरी लांगूलचालन करून परत मिळवायचे प्रयत्न सुरू आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.







