प्रतिनिधी/ पणजी
17 ते 19 एप्रिल 2023 दरम्यान नियोजित जी 20 आरोग्य क्षेत्र कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीसाठी शनिवारी 15 रोजी सकाळी दाबोळी विमानतळावर आंतरराष्ट्रीय निमंत्रित प्रतिनिधींचे पहिल्या पथकाचे आगमन झाले. यामध्ये स्वित्झर्लंडहून
फ्रॅकॉइज वॅनी, स्टेफन मर्फी, डिलन पल्वर, स्टेफनी सिडॉक्स, अलेन लॅब्रिक, डेरिक मुनीन व गॅरेट मेल; तर अमेरिकेहून एलिस अँथनी आणि स्टिवन पोस्नॅक यांचे आगमन झाले. त्याचबरोबर फ्रान्स, मॉरिशस, इंडोनेशिया, ओमान, ब्राझिल, केनिया, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंग्डम सह भारतातील निमंत्रित
प्रतिनिधी 15 एप्रिल रोजी गोव्यात दाखल झाले.
या पाहुण्यांचे स्वागत संगीतवाद्ये वाजवून करण्यात आले. त्यानंतर सीआयएसएफ सुरक्षारक्षक तसेच नियुक्त अधिकारी या पाहुण्यांना आरक्षित लाऊंजमध्ये घेऊन गेले. या ठिकाणी त्यांना नाचणीचे पापड, काजू आणि नारळपाणी असे गोमंतकीय खाद्यपदार्थ देण्यात आले. पाहुण्यांच्या स्वागताला प्रवेशद्वारे भव्य, आकर्षक व स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडवणारी रांगोळी काढण्यात आली होती. नंतर लाल गालिचावरून पाहुण्यांना विमानतळाच्या बाह्यभागी आणण्यात आले व तेथून ग्रॅन्ड हयात गोवा येथे नेण्यात आले.
सुलभ, सहज व आनंददायी वातावरणामध्ये पाहुण्यांचे स्वागत होईल यासाठी विमानतळावर चोख तयारी व नियोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर विमानतळावर चलन विनिमय कक्ष, सीमकार्ड कक्ष अशा सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
आगामी एक-दोन दिवसांत उर्वरित निमंत्रित प्रतिनिधी दाबोळी विमानतळ किंवा मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून गोव्यात दाखल होण्याची अपेक्षा आहे.
गोव्यात जी20 शिखर परिषदेची पहिली बैठक ही आरोग्य क्षेत्रासाठीच्या कृतिगटाची होणार आहे. यामध्ये आरोग्य विषयक धोरण तसेच उपक्रमांबाबत चर्चा करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. जी20 परिषद हा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय उपक्रम असून आरोग्य क्षेत्र कार्यगटाची बैठक ही जागतिक स्तरावरील आरोग्य सेवा धोरणांची भावी दिशा ठरवण्यासाठी प्रभाशाली ठरणार आहे.
ग्रुप ऑफ ट्वेंटी किंवा जी20 हा जगातील सर्वात शक्तिशाली 19 अर्थव्यवस्था आणि युरोपी महासंघ यांचा समावेश असलेला आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठीचा प्रमुख मंच आहे. जी20 गटाची स्थापना आंतरराष्ट्रीय वित्त, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, हवामानातील बदलांमुळे होणारे स्थलांतर आणि शाश्वत विकासाशी संबंधित असलेल्या प्रमुख जागतिक समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, पॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, कोरिया प्रजासत्ताक, दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक, रशिया, सौदी अरेबिया, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि युरोपीय महासंघ (ईयु) या देशांचा समावेश जी20मध्ये आहे. अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींनाही या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.









