बेळगाव, गुलबर्गासह उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यात पाणीटंचाई
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव, गुलबर्ग्यासह उत्तर कर्नाटकातील तहानलेल्या जिल्ह्यांसाठी कृष्णा व भीमा नदीतून प्रत्येकी 3 टीएमसी पाणी सोडावे, अशी मागणी कर्नाटक सरकारने महाराष्ट्राकडे केली आहे. यासंबंधी पाटबंधारे विभागाचे अप्पर मुख्य सचिव राकेश सिंग यांनी शनिवारी महाराष्ट्राला पत्र पाठविले आहे.
बेळगाव व गुलबर्ग्यासह उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी कृष्णा नदीतून 3 टीएमसी व भीमा नदीतून 3 टीएमसी असे एकूण 6 टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटक सरकारने पत्रात केली आहे.
बेळगाव, विजापूर, बागलकोट, गुलबर्गा, रायचूर, यादगिरी जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कर्नाटकातील हिप्परगी धरणामध्ये पाण्याचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोयना धरणातून 3 टीएमसी अतिरिक्त पाणी कृष्णेत सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबरोबरच महाराष्ट्रातील उजणी धरणातून भीमा नदीला 3 टीएमसी पाणी सोडावे. जेणेकरून मे, जूनमध्ये नागरिकांना व जनावरांना पिण्याची पाणी टंचाई भासणार नाही. यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून कृष्णा व भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी राकेश सिंग यांनी महाराष्ट्राकडे केली आहे. महाराष्ट्राचे पाटबंधारे विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांच्याकडे हे पत्र पाठविण्यात आले आहे.









