अन्न-औषध भेसळ विभाग अॅक्शनमोडवर : रसायनाचा वापर करून आंबे पिकविलेल्या 9 जणांना नोटिसा
प्रतिनिधी/ बेळगाव
आंबा लवकर पिकविण्यासाठी रसायनाचा वापर वाढला असल्याची माहिती अन्न व औषध भेसळ विभागाला मिळाली. दरम्यान अधिकाऱ्यांनी फळबाजाराला भेट देऊन तपासणी केली. रसायनाचा वापर करून आंबे पिकविलेल्या 9 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या. या प्रकारामुळे विक्रेते आणि ग्राहकांमध्ये खळबळ माजली आहे.
आंबा हंगामाला प्रारंभ झाला आहे. दरम्यान फळबाजारात विविध जातीचे आंबे दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे बाजार आंब्यांनी बहरू लागला आहे. मात्र काही व्यापाऱ्यांकडून आंबा लवकर पिकविण्यासाठी रसायनाचा वापर होत असल्याची बाब समोर आली आहे. आंब्याला चांगला रंग येण्यासाठी आणि लवकर पिकविण्यासाठी या रसायनाचा वापर केला जात आहे. मात्र नागरिकांसाठी रसायनाचा वापर करून पिकविलेले आंबे धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे आंबा प्रेमींनीदेखील सावध राहण्याची गरज आहे.
आंबाप्रेमींनाही बसला धक्का
अन्न व औषध भेसळ विभागाचे अधिकारी जगदीश जिंगी यांनी सहकाऱ्यांसह कारवाईचे सत्र हाती घेतल्याने आंबे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मागील दोन वर्षात कोरोनामुळे आंबाप्रेमींना म्हणावा तसा आंबा खरेदी करता आला नाही. यंदा बाजारपेठ सुरळीत सुरू झाल्याने आंबाप्रेमींची वर्दळ वाढू लागली आहे. त्यामुळे बाजारात उलाढाल समाधानकारक होऊ लागली आहे. मात्र आंबा पिकविण्यासाठी रसायनाचा वापर होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने आंबाप्रेमींनाही धक्का बसला आहे.
आंबा झाडावर पिकविण्यासाठी लागणारा वेळ वाचविण्यासाठी आणि पिकविलेला आंबा जास्त काळ टिकविण्यासाठी रसायनाचा वापर केला जाऊ लागला आहे. कॅल्शियम कार्बाईडच्या साहाय्याने आंबा पिकविला जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे अन्न व औषध भेसळ विभागाने कारवाईमध्ये सातत्य राखावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
वरून गोड, मात्र लिंबूची फोड!
सध्या बाजारात ठिकठिकाणी आंबे विकले जात आहेत. मात्र, त्यांच्या किमती सामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. तरीही काहीजण खरेदी करत आहेत. बाहेरून पिवळे धम्मक दिसणारे भरमसाट किमतीचे हे आंबे चवीला मात्र लिंबूपेक्षा आंबट निघत आहेत. हे आंबे ज्यांच्याकडून विकत घेतले, त्यांच्याकडे तक्रार केल्यास एकदा विकल्यावर आम्ही ते परत घेत नाही, अशी उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांना दीड-दोन हजारांचा फटका बसत आहे. त्यामुळे ग्राहकांना फसविणाऱ्या अशा व्यापाऱ्यांवरही कारवाईची मागणी होत आहे.









