काँग्रेसची 43 उमेदवारांची तिसरी यादी : अद्याप 15 प्रतीक्षेत : बेळगाव उत्तरमधून राजू सेठ, दक्षिणमधून प्रभावती मास्तमरडी
प्रतिनिधी/ बेंगळूर
जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या बेळगाव उत्तर आणि बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे अखेर काँग्रेसने जाहीर केली आहेत. उत्तरमधून राजू सेठ यांना तर दक्षिण मतदारसंघातून प्रभावती मास्तमरडी यांना तिकीट देण्यात आले आहे. राज्य राजकारणात चर्चेचा विषय बनलेल्या व शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश पेलेल्या माजी उपमुख्यमंत्री लक्षण सवदींना अथणीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अथणीमध्ये भाजप आमदार महेश कुमठहळ्ळी आणि काँग्रेसचे लक्ष्मण सवदी पुन्हा आमने-सामने आले आहेत. 2018 च्या निवडणुकीत कुमठहळ्ळी काँग्रेसमधून तर सवदी भाजपमधून रिंगणात होते.
काँग्रेसने आतापर्यंत 209 उमेदवारांची घोषणा केली आहे. अजून 15 उमेदवार जाहीर करणे बाकी आहे. पहिल्या यादीत 166, दुसऱ्या यादीत 42 आणि तिसऱ्या यादीत 43 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये आलेल्या लक्ष्मण सवदींना अथणीतून, तर रायबागमधून महावीर मोहित यांना तिकीट देण्यात आले आहे. अरभावीतून अरविंद दळवाई, माजी केंद्रीयमंत्री मार्गारेट अल्वा यांचे पुत्र निवेदीत अल्वा यांना कुमठा मतदारसंघातून रिंगणात उतरविण्यात आले आहे. कुंदगोळमध्ये तिकीट हुकण्याची भीती असलेल्या आमदार कुसुमा शिवळ्ळी यांना अखेर उमेदवारी देण्यात आली आहे. निजदमधून बाहेर पडलेले एन. एच. कोनरे•ाr यांना नवलगुंदमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
सिद्धरामय्या यांना कोलारमधून तिकीट नाहीच
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना कोलारमधूनही तिकीट मिळेल, असा अंदाज फोल ठरला असून येथे कोत्तनूर मंजुनाथ यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे सिद्धरामय्या केवळ वरुणामध्येच निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. हुबळी-धारवाड सेंट्रलमध्ये उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे येथून कोणाला काँग्रेसचे तिकीट मिळणार?. याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपने तिकीट नाकारल्यास शेट्टर काँग्रेसमधून निवडणूक लढवतील का?, असा प्रश्न चर्चेत आला आहे.
अभिनेत्री, माजी मंत्री उमाश्री यांना धक्का
अभिनेत्री आणि माजी मंत्री उमाश्री बागलकोट जिल्ह्यातील तेरदाळमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. मात्र, त्यांना तिकीट देण्यास मतदारसंघातील कार्यकर्ते, नेत्यांनी विरोध केला होता. स्थानिकालाच तिकीट द्यावे, अशी मागणी करण्यात आल्याने उमाश्रींना तिकीट नाकारण्यात आले. या ठिकाणी सिद्धप्पा कोण्णूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपमधून काँग्रेस पक्षात आलेल्या रेवू नायक बेळमगी यांना गुलबर्गा ग्रामीणमधून तिकीट देण्यात आले आहे. मुडिगेरे राखीव मतदारसंघात मोटम्मा यांची मुलगी नयना यांना तिकीट देण्यात आले आहे. मद्दूरमध्ये एस. एम. कृष्णा यांचे पुतणे गुरुचरण यांना तिकीट मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, त्यांचा अपेक्षाभंग झाला असून येथे के. एम. उदय यांना तिकीट दिले आहे. निजद सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या माजी आमदार के. एम. शिवलिंगेगौडा यांना अरसीकेरेमधून तिकीट देण्यात आले आहे. चित्रपट निर्माते उमापती श्रीनिवास गौडा यांना बेंगळूरच्या बोम्मनहळ्ळीत तिकीट दिले आहे. माजी मुख्यमंत्री व निजद वरिष्ठ नेते कुमारस्वामी यांच्याविरुद्ध काँग्रेसने एस. गंगाधर यांना प्रतिस्पर्धी बनविले आहे.
शेट्टर यांचे भवितव्य आज ठरणार

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना हुबळी-धारवाड सेंट्रलमधून तिकीट द्यावे का, याबाबत भाजपने अद्याप निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, वरिष्ठांनी शेट्टर यांच्यापुढे पत्नी शिल्पा शेट्टर किंवा सून श्रद्धा शेट्टर यांना तिकीट देण्याची ऑफर ठेवली. ती देखील त्यांनी फेटाळून लावली. आपणच निवडणूक लढविणार, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. भूमिका निश्चित करण्यासाठी जगदीश शेट्टर यांनी शनिवार सकाळी हुबळीत समर्थकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी रात्री 8:30 पर्यंत वरिष्ठांना अल्टिमेटम दिला. त्यामुळे रात्री भाजप राज्य निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी शेट्टर यांची हुबळीतील निवासस्थानी भेट घेतली. आता भाजपची तिसरी उमेदवार यादी रविवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे त्यांना तिकीट मिळेल का?, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
भाजपची तिसरी यादी आज
भाजपने आतापर्यंत 224 पैकी 212 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अजून 12 मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करणे बाकी आहे. रविवारी पक्षाची तिसरी यादी जाहीर होणार आहे. हुबळी-धारवाड सेंट्रल, मान्वी, गोविंदराजनगर, रोण, नागठाण, एच. डी. कोटे, के. आर. नगर, महादेवपूर, कोप्पळ, शिमोगा शहर सेडम या मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर करणे बाकी आहे.
मतदारसंघ उमेदवार
अथणी लक्ष्मण सवदी
रायबाग महावीर मोहिते
अरभावी अरविंद दळवाई
बेळगाव उत्तर राजू सेठ
बेळगाव दक्षिण प्रभावती मास्तमरडी
नवलगुंद एन. एच. कोनरेड्डी
कुमठा निवेदीत अल्वा
सिंदगी अशोक मनगुळी
तेरदाळ सिद्धप्पा कोण्णूर
कुंदगोळ कुसुमा शिवळ्ळी
शिमोगा एच. सी. योगेश
शिकारीपूर जी. बी. महेश
औराद डॉ. भीमसेनराव शिंदे









