नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड टेनिंगने (एनसीईआरटी) इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि हिंदी या पुस्तकांमधून अनेक प्रकरणे आणि माहिती काढून टाकली आहे. त्यात मुघल, महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे, 2002 ची गुजरात दंगल, आणीबाणी, शीतयुद्ध आणि नक्षलवादी चळवळीशी संबंधित पाठांचा समावेश आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोधकांनी विरोध केला आहे. केंद्र सरकार सूडाच्या भावनेने पुस्तकांमध्ये दिलेल्या ऐतिहासिक माहितीचे पाठ गायब करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांच्या आरोपानंतर शिक्षण मंत्रालयाने शनिवारी स्पष्टीकरणही दिले. सीबीएसईच्या 25 तज्ञ आणि 16 शिक्षकांच्या सल्ल्यानंतरच अभ्यासक्रम तर्कशुद्ध करण्यात आला आहे. तसेच वगळण्यात आलेले पाठ पुन्हा समाविष्ट केले जाणार नसल्याचे शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.









