वृत्तसंस्था साओपावलो (ब्राझील)
येथे सुरू असलेल्या 2023 च्या ब्राझील पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि जागतिक मानांकनात चौथ्या स्थानावरील सुकांत कदम यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.
प्रमोद भगतने या स्पर्धेत पुरुष एकेरी, मिश्र दुहेरी आणि पुरुष दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. सुकांत कदमने पुरुष एकेरी आणि दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीच्या सामन्यात प्रमोद भगतने ब्राझीलच्या रेसन फरेरा, डॉमनिक प्रजासत्ताकचा पॅट्रिसिओ अँड्रेस ओलेव्ही यांचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. आता प्रमोद भगतचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना पेरुच्या पेद्रो डीव्हिनेटाशी होणार आहे. पुरुष दुहेरीत प्रमोद भगत आणि सुकांत कदम यांनी भारताच्या निलेश बाळू गायकवाड आणि मनोज सरकार तसेच डॉमनिक प्रजासत्ताकच्या ओलेव्ही आणि पाब्लो सिझर तसेच तिसऱ्या फेरीतील लढतीत ब्राझीलच्या ब्रेनो जोहान आणि झुफो यांचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. मिश्र दुहेरीत प्रमोद भगत आणि मनीषा रामदास यांना पहिल्या फेरीच्या सामन्यात हार पत्करावी लागली होती. त्यानंतर पुढील लढतीत पेरुच्या डिक्वेझ आणि व्हेंटोसिला यांचा पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम राखली. त्याचप्रमाणे भारताच्या या जोडीने अझरबैजानच्या इब्राहिम अॅलिएव्ह व फ्रान्सचा नॉडिन यांचाही पराभव केला. मनीषा आणि प्रमोद या जोडीने पुढील फेरीतील लढतीत भारताच्या चिराग बारेथा आणि मनदीप कौर यांचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. भारताच्या सुकांत कदमने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात ब्राझीलच्या मॅडेराचा तर त्यानंतर पुढील फेरीच्या लढतीत कोरियाच्या सुनवू आणि ब्राझीलच्या डीऑलिव्हराचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. सुकांत कदमचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना भारताच्या सुहास यतिराजशी होणार आहे.









