मुख्यमंत्री सावंत यांचे जयंती कार्यक्रमात प्रतिपादन : पर्वरीत आंबेडकर भवन उभारण्याचा मार्ग खुला
पणजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला भारतीय लोकशाहीचे सामर्थ्य दाखवून दिले. त्यांनी निर्मिलेली घटना म्हणजे संपूर्ण भारतीयांसाठी अनमोल ठेवा आहे. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान हे न विसरण्याजोगे आहे. त्यांनी घटनानिर्मिती करून घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वेच देशाला पुढे घेऊन जात आहेत, असे सांगून अशा या संविधान निर्मात्याची जयंती यापुढे सरकार पातळीवर राज्यस्तरीय सोहळा होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. पणजीतील डॉ. आंबेडकर उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विधानसभेचे सभापती रमेश तवडकर, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार प्रवीण आर्लेकर, जिल्हाधिकारी मामू हागे, अनुसूचित जाती-जमातीचे अध्यक्ष अनिल होबळे, समाजकल्याण खात्याच्या संचालिका संध्या कामत, एससी/एसटी आयोगाचे आयुक्त दीपक करमळकर उपस्थित होते.
आंबेडकर भवनाचा मार्ग मोकळा
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव, युगपुऊष होते. त्यामुळे त्यांचे राज्यात भवन असावे यासाठी सरकार कसोसीने प्रयत्न करीत आहे. मध्यंतरी तांत्रिक कारणामुळे आंबेडकर भवनास उशीर झाला. परंतु आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पर्वरी या ठिकाणी जमीन खरेदी करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत पायाभरणी सोहळा होईल. या भवनात अनुसूचित जाती, जमाती बांधवांच्या विद्यार्थ्यांना पणजीत शिक्षण घेताना अडचण येऊ नये, यासाठी वसतिगृहही उभारण्यात येईल, असे ते म्हणाले.
बाबासाहेबांनी सूर्याप्रमाणे प्रकाश दिला
मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उंची ही मोजण्याइतकी नसून, ज्या प्रमाणे सूर्य प्रत्येकासाठी उजेड देतो त्या सूर्याप्रमाणेच बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक घटकाला प्रकाश देण्याचे काम केले आहे. त्यांनी निर्मिलेल्या संविधानावरच देशाचा पाया अखंडित मजबूत आहे.
समाजाला एकसंघ ठेवण्याकडे लक्ष हवे
राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या बांधवांनी केवळ वर्तमानपत्रात फोटो प्रसिद्ध करून समाजाच्या कार्याचे श्रेय घेण्याऐवजी सर्व समाजाला एकत्र एकसंघ कसे ठेवले जाईल, याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. असे झाले तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मंत्र ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ यशस्वी होईल, असेही ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दिशादर्शक व्यक्तिमत्व असल्याने राज्यात त्यांच्या नावाने भवन असावे यासाठी 7 कोटी 54 लाख ऊपये मंजूर करण्यात आल्याचेही फळदेसाई यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरवातीला मुख्यमंत्री डॉ. सावंत, सभापती तवडकर, मंत्री सुदिन ढवळीकर, मंत्री गावडे, सदानंद शेट तानावडे व इतर उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संध्या कामत यांनी स्वागत केले. अनिल होबळे यांनी आभार मानले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराचे मानकरी
गेले वर्षभर समाजसेवेसाठी झटणाऱ्या समाजबांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कार्याची दखल म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जयंतीदिनी दिला जातो. यंदा ह्या पुरस्काराचे मानकरी म्हणून दामोदर कुडाळकर (वास्को), भानुदास कोरगावकर (म्हापसा), वसंत परवार (बोरी), अर्जुन जाधव (बोरी) या अनुसूचित जाती व जमातीतील बांधवांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
समाजबांधवांच्या मुलांचाही गौरव
अनुसूचित जाती व जमातीतील समाजबांधवांच्या दहावी, बारावीत यश संपादन केलेल्या मुलांनाही समाज कल्याण खात्यातर्फे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्रक व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांमध्ये अंकिता अनिल कांबळे, दामोदर लोकापुरे, आदिती आर्लेकर, रिशीता चव्हाण, महिमा परवार, श्रृती तलवार, कृष्णा मथवडकर, दीक्षा केनवडेकर, तीषा निपाणीकर, ईशा हळर्णकर, श्रेया निपाणीकर, सेजल कुडाळकर, तृप्ती रेडकर, मयुरी पेडणेकर आदींचा समावेश होता.









