म्हादईप्रश्नी विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांना सवाल
पणजी ;केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकातील लोकांना खूश करण्यासाठी आपल्या जोशपूर्ण भाषणात म्हादईसंदर्भात विधान केले खरे, परंतु हेच विधान आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना तोंडघशी पाडण्यास कारणीभूत ठरू लागले आहे. अमित शहा यांच्या रविवारी गोवा भेटीची संधी घेत राज्यातील विविध विरोधी पक्षांचे नेते मुख्यमंत्र्यांना टार्गेट करू लागले असून, ’अमित शहा बोलले ते खरे की खोटे’ याचे स्पष्टीकरण देण्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांना देऊ लागले आहेत. बेळगाव येथे सभेत बोलताना गृहमंत्री शहा यांनी, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊनच म्हादईचे पाणी वळविण्याचा निर्णय घेतल्याचे वक्तव्य केले होते. त्यातून, ’म्हादईसाठी कोणतीही तडजोड करणार नाही’, अशा घोषणा वारंवार करणारे मुख्यमंत्री थेट तोंडघशी पडले होते. शहांचे सदर वक्तव्य म्हणजे विरोधकांसाठी आयतेच कोलीत हाती सापडल्याने सर्वांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठविली होती.
… तर मुख्यमंत्र्यांनी निर्दोषत्व सिद्ध करावे
आता स्वत: गृहमंत्रीच गोव्यात येत असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांना सदर वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगावे व स्वत: निर्दोष असल्याचे सिद्ध करावे, असे आव्हान गोवा फॉरवर्ड पक्षाने दिले आहे. या आव्हानाचा सामना करण्याचे धाडस मुख्यमंत्री दाखवतात की गृहमंत्र्यांचे वक्तव्य खरे असल्याचे सिद्ध करतात हे पाहण्यासाठी गोमंतकीय अधीरतेने वाट पाहत आहेत, असे आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांना स्वत:ची भूमिका स्पष्ट करण्याची हीच संधी असून अन्यथा गृहमंत्री बोलल्याप्रमाणे त्यांनी सत्तेसाठी व स्वत:च्या फायद्यासाठी संगनमत करून तडजोड का केली हेच सिद्ध होईल, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. यावर आता मुख्यमंत्री गप्प बसतात की आणखी वेगळे बोलून लोकांचा विश्वासघात करतात हेच पहावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.









