सभापती रमेश तवडकर यांचे न्यायालयास स्पष्टीकरण
पणजी : गोवा राज्य काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी सभापती रमेश तवडकर यांच्या विरोधात उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेची दखल घेण्यात आली असून सर्व संबंधितांना नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, तवडकर यांनी दिगंबर कामत, मायकल लोबो यांच्या विरोधातील अपात्रता याचिकेवर प्रथम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सुनावणीच्यावेळी स्पष्ट केले. त्यानंतर 8 फुटीर आमदारांबाबत निकाल देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. गोवा प्रदेश काँग्रेसचे नेते माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उच्च न्यायालयात सादर केलेली याचिका सुनावणीस घेण्यात आली. काँग्रेसच्या 8 फुटीरांविरोधातील अपात्रता याचिकेवर निकाल देण्याचे निर्देश सभापतींना द्यावेत अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशी याचिका 90 दिवसात (3 महिने) निकालात काढणे आवश्यक आहे. आता चोडणकर यांनी 8 फुटीरांविरोधात अपात्रता याचिका सादर कऊन 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला, आहे याकडे लक्ष वेधले आहे. पाटकर यांनी तशाच आशयाची याचिका उच्च न्यायालयात सादर कऊन अपात्रता याचिकेवर निकाल देण्याचे आदेश सभापतींना द्यावेत अशी याचना केली आहे. तवडकर यांनी यापूर्वी सभापती हे पद घटनात्मक असल्याने न्यायालय तसा आदेश देऊ शकत नाही, असा दावा केला होता. आता त्यांनी वरीलप्रमाणे न्यायालयासमोर स्पष्टीकरण दिले आहे.









