ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर भर सभेत स्मोक बॉम्बने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातून किशिदा थोडक्यात बचावले आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना सुखरुप बाहेर काढले असून, त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. याप्रकरणी वाकायामा येथील बंदरातून एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, किशिदा हे त्यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ एका कार्यक्रमात बोलण्यासाठी आले होते. या सभेला संबोधित करताना त्यांच्यावर पाईपसारखी वस्तू फेकण्यात आली. त्याचा मोठा स्फोट झाला. सुदैवाने किशिदा या हल्ल्यातून बचावले. त्यांना सुरक्षारक्षकांनी तात्काळ सुखरूप बाहेर काढले. स्फोटानंतर सर्वत्र धूर पसरला होता. नागरिकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आणि लोक सैरावैरा धावत होते. या घटनेचा व्हिडिओ BNONE News या वृत्तवाहिनीने ट्विटरवर शेअर केला आहे.









