रस्ता कामामुळे समस्येत भर : रहदारी पोलिसांच्या नियुक्तीची गरज
बेळगाव : शहरातील रस्ता विकासकामामुळे वाहतूक कोंडीची समस्या दररोज भेडसावत आहे. विशेषत: खानापूर रोड रस्ता काँक्रिटीकरणामुळे वाहनधारकांसह स्थानिक रहिवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अनगोळ नाका परिसरात दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. तिसरे रेल्वेगेट ते बसवेश्वर चौकापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. एका बाजुच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम करण्यात येत आहे. काही ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तर काही ठिकाणी अद्यापही सुरू असल्याने वाहनधारकांना डोकेदुखीचे बनले आहे. आरपीडी कॉर्नर ते अनगोळ नाक्यापर्यंतच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. दोन्ही रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आले आहेत. मात्र तिसऱ्या रेल्वेफाटकाच्या दुसऱ्या बाजूच्या उ•ाणपुलाचे काम हाती घेण्यात आल्याने रेल्वेफाटक वाहतुकीस बंद करण्यात आले आहे. परिणामी वाहनधारकांना अनगोळ नाका परिसरातून ये-जा करावी लागत आहे. तर दुसऱ्या रेल्वेफाटकावर वाहनांचा ताण वाढला असून अनगोळ नाका परिसरात वाहतूक केंडीची समस्या भेडसावत आहे. रस्ता रुंदीकरणासह उ•ाणपुलाच्या कामामुळे या परिसरातून वाहनधारकांना ये-जा करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या परिसरात वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच विविध रुग्णालये, व्यावसायिक अस्थापने असल्याने नागरिकांची ये-जा कायम असते. या ठिकाणी सुरू असलेले काम नियोजनबद्ध नाही. याचा फटका स्थानिक रहिवाशांना व व्यावसायिकांना बसत आहे. सध्या दररोज वाहतूक कोंडी होत असून याठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अनगोळसह टिळकवाडी भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.