गावागावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन : प्रभातफेरी, भाषण, गायन स्पर्धांसह जीवनचरित्रावर व्याख्यान
वार्ताहर /किणये
तालुक्यात शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावागावातील विविध संघ-संघटना, प्राथमिक मराठी-कन्नड शाळा, हायस्कूल, कॉलेज तसेच विविध संस्था, सरकारी कार्यालयांमध्येही आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही गावांमध्ये प्रभातफेरीही काढण्यात आली. अनेक ठिकाणी विविध भाषण, गायन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्याख्यानांचे आयोजन केले होते. कर्नाटक दलित युवा संघटना शाखा किणये यांच्यावतीने आंबेडकर गल्ली किणये येथे शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. आंबेडकर जयंतीनिमित्त गल्लीत प्रत्येक घरासमोर आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली होती. डॉ. कृष्णा पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य हेमंत पाटील, मारुती डुकरे, अरविंद कीर्तने, श्रीधर गुरव, अजित डुकरे, रवी गुरव, कृष्णा गुरव, विनायक डुकरे आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली. आंबेडकर जयंतीनिमित्त सायंकाळी गावात संघटनेच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत तरुणांसह ग्रामस्थांचा मोठा सहभाग दिसून आला. आंबेडकर गल्ली वाघवडे येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महिलांचा लक्षणीय असा सहभाग दिसून आला. तालुक्याच्या अनेक गावांमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. मच्छे, पिरनवाडी, बेळगुंदी, बेळवट्टी आदी भागात आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.