नागरिकांचे हेलपाटे थांबणार : जवळच्या कार्यालयात नागरिकांना सुविधा घेण्याचे आवाहन
बेळगाव : नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहराच्या विविध भागात नवीन आठ स्मॉल कर्नाटक वन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. खासबाग, टिळकवाडी, अलारवाड, उज्ज्वलनगर, बसवण कुडची, बॉक्साईट रोड, पिरनवाडी, वडगाव आदी ठिकाणी ही नवीन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे आता नागरिकांना जवळच्या केंद्रातून शासकीय कागदपत्रे उपलब्ध होणार आहेत. कर्नाटक वन कार्यालयात वीजबिल, पाणीपट्टी, घरपट्टी, आधारकार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, आयुष्मान भारत यासह इतर शासकीय कागदपत्रांची पूर्तता केली जाते. त्यामुळे नागरिकांची सतत वर्दळ असते. अशोकनगर, गोवावेस, रिसालदार गल्ली या ठिकाणी कर्नाटक वन कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागात आठ ठिकाणी नवीन कर्नाटक वन कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना जवळच्या कार्यालयातून शासकीय कागदपत्रे काढून घेणे सोयीस्कर होणार आहे.
कर्नाटक वन कार्यालयात आधारकार्ड दुरुस्तीबरोबरच लाईट बिल, पाणी बिल, घरपट्टी आणि इतर मालमत्ता करदेखील भरून घेतला जातो. त्यामुळे नागरिकांची गर्दी अधिक असते. दरम्यान रिसालदार गल्ली, अशोकनगर, गोवावेस या ठिकाणी असलेल्या कार्यालयांवर ताण वाढत होता. त्यामुळे नवीन आठ स्मॉल कर्नाटक वन कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे जुन्या कार्यालयांवरील ताण काहीसा कमी होणार आहे. मरगम्मा गल्ली, बनशंकरी देवस्थानच्या बाजूला खासबाग, टिळकवाडी येथील जीएसएस कॉलेज कंपाउंडजवळ, अलारवाड बसस्टँडजवळ, उज्ज्वलनगर बसवाण कुडची, बॉक्साईट रोड, पिरनवाडी, वडगाव आदी ठिकाणी नवीन स्मॉल कर्नाटक वन सेंटर सुरू करण्यात आली आहेत. याठिकाणी कर्नाटक वन सेवा पुरविणार असून नागरिकांनी जवळच्या कार्यालयात जाऊन सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.