उच्चस्तरीय चौकशीचे आदेश : दिल्ली पोलिसांकडूनही तपास
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित गँगस्टर प्रिन्स तेवतिया शुक्रवारी तिहार कारागृहात झालेल्या टोळीयुद्धात मारला गेला. चाकूने वार केल्याने गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात आणले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून या घटनेची केंद्रीय गृह मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक तिहार तुरुगात पोहोचले आहे. याप्रकरणी हरिनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी कैदी अख्तर, विनय आणि बॉबी यांच्यावर पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
गँगस्टर प्रिन्स तेवतिया याच्यावर चाकूने 5-7 वार केले होते. तिहारच्या तुरुग क्रमांक 3 मध्ये संध्याकाळी 5 वाजता हे टोळीयुद्ध झाले. या घटनेनंतर तिहार तुरुगाचे पोलीस जखमी प्रिन्स तेवतियासह एकूण 5 कैद्यांना घेऊन दिल्लीच्या दीनदयाल रुग्णालयात पोहोचले होते. कारागृह प्रशासनाने या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. याआधी 9 मार्च रोजी तिहार तुरुग प्रशासनाने तुरुग क्रमांक 3 वर छापा टाकून सर्जिकल ब्लेड्स, ड्रग्ज आणि मोबाईल फोन जप्त केले होते.
मोस्ट वॉन्टेड गँगस्टर प्रिन्स तेवतिया याचा कारागृहात रोहित चौधरी टोळीतील हस्तकांशी वाद झाला होता. या वादातून टोळीयुद्ध झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. प्रिन्सवर दिल्लीतील विविध पोलिस ठाण्यात खून, खुनी हल्ला, खंडणीसह एकूण 15 गुन्हे दाखल आहेत. मोक्का अंतर्गत तिहार तुरुगात बंद असलेला गुंड रोहित चौधरी टोळीशी त्याचे भांडण होते. त्याने उत्तर भारतातील कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि हाशिम बाबा यांच्याशी हातमिळवणी केली होती. तसेच 2012 आणि 2020 मध्ये न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी त्याच्यावर स्वतंत्र एफआयआर नोंदवण्यात आले आहे.









