वृत्तसंस्था/ भोपाळ
येथील मध्यप्रदेश राज्याच्या शुटींग अकादमीमध्ये सुरू झालेल्या रायफल आणि पिस्तूल निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेतील पहिल्या दिवशी मनू भाकर आणि अर्जुन बेबुटा यांनी विजेतेपद मिळवले. आगामी होणाऱ्या विश्व नेमबाजी चॅम्पियनशिप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय नेमबाजी संघाची निवड करण्याकरिता ही निवड चाचणी स्पर्धा घेतली जात आहे.
या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महिलांच्या 25 मी. पिस्तूल नेमबाजीत मनू भाकरने मध्यप्रदेशच्या चिंकी यादवचा 31-29 असा पराभव करत सुवर्णपदक मिळवले. या क्रीडा प्रकारात रिदम सांगवानने कास्यपदक घेतले. पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल टी थ्री प्रकारात पंजाबचा नेमबाज अर्जुन बेबुटाने रेल्वेच्या अखिल शेरॉनचा 16-6 असा पराभव करत सुवर्णपदक मिळवले. महिलांच्या 50 मी. थ्री पोजिशन रायफल नेमबाजीत मध्यप्रदेशच्या आशी चोक्सीने सुवर्णपदक मिळवताना ओदिशाचा श्रीयांका सदनगीचा 16-10 असा पराभव केला. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत धनुष्य श्रीकांतने तर महिलांच्या 50 मी. थ्री पोजिशन रायफल नेमबाजीत निकीता कुंडूने सुवर्णपदक घेतले.









