सोने 62 हजारांवर : चांदी दर 80 हजारांसमीप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये वाढीचे सत्र सुरूच आहे. दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 480 रुपयांनी वाढून 61,780 रुपये प्रति 10 ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. गुरुवारच्या व्यवहाराअंती सोन्याचा भाव 61,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तसेच चांदीचा भाव 410 रुपयांनी वाढून 77,580 रुपये किलो झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजकडून जाहीर करण्यात आले. राष्ट्रीय राजधानीमध्ये सोने-चांदी दरांनी हा उच्चांक गाठला असतानाच देशात अन्यत्र हा दर त्यापेक्षाही एक-दोन हजार रुपयांनी अधिक आहे.
आर्थिक राजधानी मुंबईमध्ये शुक्रवारी सोन्याचा भाव 600 रुपयांच्या वाढीसह 61,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. गेल्या टेडिंग सत्रात सोन्याचा भाव 61,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. याशिवाय चांदीचा भावही 1,600 रुपयांनी वाढून 79,600 रुपये प्रतिकिलो झाल्याचे ‘गुड रिटर्न्स’च्या वेबसाईटवर दिसून येत आहे. देशात अन्य शहरांमध्ये चांदीचा भाव 80 हजार रुपये प्रतिकिलोच्या पुढे पोहोचल्यामुळे ग्राहक धास्तावले आहेत.
पुढील आठवड्यात येणाऱ्या अक्षय्य तृतीया आणि त्यानंतरच्या आठवड्यात येणाऱ्या गुरुपुष्यामृत योग या शुभ मुहूर्तांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी अपेक्षित आहे. मात्र, या शुभ मुहूर्तांपूर्वीच दरात झपाट्याने वाढ होत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. जागतिक बाजारातील तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 62,000 च्या जवळ बंद झाला आहे. याशिवाय चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.