मद्य घोटाळा प्रकरणी उद्या चौकशी होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी करणार आहे. सीबीआयने रविवार, 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुख्यालयात पाचारण केंले आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकार अरविंद केजरीवाल यांना तुऊंगात टाकण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला. या चौकशीला आम्ही घाबरत नाही. केजरीवाल यांनी 13 दिवस उपोषण करून भ्रष्टाचाराविरोधात लढा दिला. दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर त्यांना नोटीस देऊन धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केजरीवाल किंवा त्यांचा कोणताही नेता यापुढे झुकणार नाही आणि घाबरणार नाही, असे ते म्हणाले.
भाजप नेते खुराणांनी साधला निशाणा
सीबीआयच्या नोटिसीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते हरिष खुराणा यांनी अरविंद केजरीवालांना टार्गेट केले आहे. आता पुढचा नंबर अरविंद केजरीवाल यांचाच लागणार असल्याची सर्वांनाच कल्पना होती. मद्य घोटाळ्याची सर्व बोलणी केजरीवाल यांच्या घरी झाल्याची कबुली मनीष सिसोदिया यांनी दिल्यामुळे ते तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचे खुराणा यांनी स्पष्ट केले. केजरीवाल यांनी स्वत:ला कट्टर प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देणे बंद करावे. तुमच्या घरी व्यवहार झाला असून तुम्हाला उत्तर द्यावे लागेल, असे सांगत कायदा आपले काम करत असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे, आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये सामील झालेले कपिल मिश्रा यांनीही केजरीवालांवर टीका केली आहे. मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि केजरीवाल हे तिघेही भ्रष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केजरीवाल यांचे ईडीवर आरोप, अन्…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयावर (ईडी) मद्य धोरण प्रकरणात खोटे पुरावे देऊन न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप केला. दिल्ली विधानसभेत आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केजरीवाल यांनी ईडी लोकांचा छळ करून आणि त्यांच्यावर दबाव टाकून खोटी विधाने करत असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या ह्या आरोपानंतर काही तासांमध्येच त्यांना सीबीआयची नोटीस प्राप्त झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे.
मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी अटक
मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ईडीच्या ताब्यात आहेत. त्यांना 26 फेब्रुवारीला सलग आठ तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने अटक केली होती. 7 दिवसांच्या सीबीआय कोठडीनंतर न्यायालयाने 6 मार्च रोजी सिसोदिया यांना 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठोठावत तिहार तुरुगात पाठवले. ईडीने त्यांची मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी केली होती. ते सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. गेल्या सुनावणीत न्यायालयाने सिसोदिया यांच्या कोठडीत 17 एप्रिलपर्यंत वाढ केली होती. सिसोदिया यांच्या जामिनावर 18 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.