आसाममध्ये पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन ः 14,300 कोटींच्या प्रकल्पांचे अनावरण
वृत्तसंस्था / गुवाहाटी
आसाममधील प्रसिद्ध बिहू उत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गुवाहाटी येथे पोहोचले. येथे त्यांनी 14,300 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. सर्वप्रथम त्यांनी गुवाहाटी येथे एम्सचे उद्घाटन केले. याशिवाय नलबारी, नागाव आणि कोक्राझार येथील तीन वैद्यकीय महाविद्यालयांचे व्हर्च्युअल प्रणालीद्वारे उद्घाटन केले.
आसामच्या वसंतोत्सव ‘रोंगाली बिहू’च्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी आसामला मोठी भेट दिली. आसाम दौऱयावर असलेल्या पंतप्रधानांचे गुवाहाटी विमानतळावर राज्यपाल गुलाबचंद कटारिया आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वागत केले. त्यानंतर दिवसभर विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली. पंतप्रधानांनी 1,120 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या गुवाहाटी एम्सचे उद्घाटन केले. या प्रकल्पाची पायाभरणी त्यांच्या हस्ते मे 2017 मध्ये करण्यात आली होती. याशिवाय त्यांनी नलबारी, नागाव आणि कोक्राझार ही 500 खाटांची तीन वैद्यकीय महाविद्यालयेही आसामवासियांसाठी खुली केली. गुवाहाटीतूनच त्यांनी या वैद्यकीय महाविद्यालयांचे व्हर्च्युअल प्रणालीद्वारे उद्घाटन केले. याप्रसंगी पंतप्रधानांनी औपचारिकपणे ‘आपके द्वार आयुष्मान’ मोहिमेचा शुभारंभ करत काही निवडक लाभार्थींना आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना कार्डचे वाटप केले. आता नजिकच्या काळात राज्यातील सर्व जिह्यांमध्ये सुमारे 1.1 कोटी कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय पंतप्रधान मोदींनी आसाम ऍडव्हान्स्ड हेल्थ केअर इनोव्हेशन इन्स्टिटय़ूटची पायाभरणीही केली. पंतप्रधानांचे ‘आत्मनिर्भर भारत’ आणि मेक इन इंडियाचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे.
सेवक भावनेतून काम ः पंतप्रधान
उद्घाटन आणि पायाभरणी समारंभादरम्यान पंतप्रधानांनी उपस्थित लोकांना संबोधित केले. बिहू उत्सवाच्या शुभेच्छा देत त्यांनी ईशान्येकडील आरोग्य पायाभूत सुविधांना आज एक नवीन बळ मिळाल्याचे ते म्हणाले. आज ईशान्येला पहिले एम्स आणि आसामला तीन नवीन वैद्यकीय महाविद्यालये मिळाली आहेत. गेल्या नऊ वर्षांत, आम्ही पायाभूत प्रकल्पांवर काम केले आहे आणि म्हणूनच प्रत्येकजण कनेक्टिव्हिटीशी संबंधित पायाभूत प्रकल्पांबद्दल बोलतो. आपला सेवक असल्याच्या भावनेने आम्ही काम करत असल्यामुळे आता ईशान्य भारत आम्हाला दूर वाटत नाही. आपुलकीच्या भावनेने पुढे येत आम्ही विकासाची सूत्रे स्वतः हाती घेतली आहेत. भारताच्या विकासाचा मंत्र घेऊन पुढे जात आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांवर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान विरोधकांवर आगपाखड व्यक्त केली. मी ईशान्येच्या विकासाबद्दल बोललो तर माझ्या देशभरातील दौऱयांदरम्यान काही लोक पेडिट मिळत नसल्याच्या तक्रारी करू लागतात. ते पेडिट भुकेले असल्यामुळे ईशान्य भारत त्यांच्यासाठी खूप दूर होता. मात्र, आम्ही लोकांच्या भल्यासाठी काम करतो, असे त्यांनी सांगितले. विरोधकांनी श्रेयाची भूक आणि जनतेवर राज्य करण्याच्या भावनेने देशाचे खूप नुकसान केले आहे. व्होट बँकेऐवजी देशातील जनतेच्या अडचणी कमी करण्यावर आम्ही भर दिला. आमच्या माता-भगिनींना उपचारासाठी दूर जावे लागू नये, हे आमचे ध्येय होते. पैशांअभावी कोणत्याही गरिबावर उपचार न मिळण्याची नामुष्की ओढवू नये, यासाठी आमची धडपड सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 2014 पूर्वी 10 वर्षात केवळ 150 वैद्यकीय महाविद्यालये बांधली गेली होती. मात्र गेल्या 9 वर्षात आमच्या सरकारमध्ये सुमारे 300 नवीन वैद्यकीय महाविद्यालये बांधली गेली आहेत. देशात एमबीबीएसच्या जागाही गेल्या 9 वर्षांत दुपटीने वाढून 1 लाखांहून अधिक झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
ब्रिटिशकालीन कायदे बदलण्याची गरज
आसाम दौऱयावेळी पंतप्रधानांनी उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सव (प्लॅटिनम ज्युबिली) सोहळय़ाला हजेरी लावली. येथील उच्च न्यायालय 75 वर्षे पूर्ण करत असताना आपला देशही स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करत आहे. हे एक अद्वितीय उच्च न्यायालय असून याला सर्वोच्च अधिकार क्षेत्र आहे. आपल्या देशात अनेक कायदेशीर तरतुदी ब्रिटीशकालीन आहेत. अशा जुन्या कायद्यांमध्ये आता कालानुरुप बदल करण्याची गरज आहे. अनेक कायदे पूर्णपणे असंबद्ध झाले असून आम्ही शासन स्तरावर सातत्याने आढावा घेत आहोत, असे त्यांनी सांगितले. कायद्यांच्या सुलभीकरणाची प्रक्रिया सुरू असून कायदा हा सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिला जावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.









