केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची टीका ः ‘दीदी’ जनतेसाठी करत नाही काम
वृत्तसंस्था/ कोलकाता
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर शुक्रवारी निशाणा साधला आहे. ममतादीदी बंगालच्या जनतेसाठी काम करत नाहीत. स्वतःच्या भाच्याला मुख्यमंत्री करणे हेच त्यांचे एकमात्र लक्ष्य असल्याची टीका शाह यांनी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील महिन्यात होणाऱया स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांनी राज्याचा दौरा केला आहे. या दौऱयाचा उद्देश पक्षाचे संघटन मजबूत करणे आहे.
ममतादीदींच्या शासनकाळात बंगाल आता बॉम्बस्फोटांचे केंद्र ठरले आहे. एनआयएने अलिकडेच बीरभूममध्ये 80 हजारांहून अधिक डेटोनेटर आणि 27 हजार किलो अमोनियम नायट्रेट जप्त केले आहे. एनआयएने ही स्फोटक सामग्री जप्त केली नसती तर शेकडो लोकांना जीव गमवावा लागला असता असा दावा शाह यांनी केला आहे.
आगामी निवडणुकीच्या काळात भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवर हल्ले करण्याचा विचार करणाऱया तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांची अवस्था अनुव्रत मंडल यांच्यासारखी होईल. बंगालमध्ये घुसखोरीची सर्वाधिक समस्या असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निदर्शनास आणू देऊ इच्छितो. बंगालला आत्या-भाच्याच्या कुशासनापासून मुक्त करावे लागेल असे उद्गार बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी काढले आहेत.
अमित शाह यांनी बीरभूममध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले आहे. तर सूरी येथील जिल्हा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले आहे. यानंतर शाह त्यांनी दक्षिणेश्वर मंदिरात जात पूजा केली आहे. याचबरोबर राज्यातील पक्षनेत्यांसोबत बैठक घेत पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेतला आहे.
शाह यांचा हा बंगाल दौरा भाजपच्या ‘प्रवास’ अभियानाचा हिस्सा आहे. या अभियानांतर्गत भाजप 2019 मध्ये किरकोळ मतांनी पराभव पत्करावा लागलेल्या मतदारसंघांमधील राजकीय बळ वाढवू पाहत आहे. भाजपने मागील लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालातील 42 जागांपैकी 18 जागांवर विजय मिळविला होता.









