अमेरिकेच्या वायुदलाचा होता कर्मचारी ः एफबीआयने घरातून हस्तगत केले दस्तऐवज
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
रशिया-युक्रेन युद्धावरून अमेरिकेचे गोपनीय दस्तऐवज उघड करणाऱया आरोपीला एफबीआयने अटक केली आहे. आरोपीचे नाव जॅक टेक्सीरा असून तो 21 वर्षांचा आहे. तसेच तो मॅसाच्युसेट्स एअर नॅशनल गार्डचा सदस्य होता. महत्त्वाचे दस्तऐवज उघड करणारा आरोपी अमेरिकेच्या कुठल्यातरी सैन्यतळावर कार्यरत असल्याचा सुगावा यापूर्वी एफबीआयला लागला होता.
एफबीआयकडून मागील काही दिवसांपासून जॅकवर पाळत ठेवली जात होती. यानंतर गुरुवारी दुपारी (भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी) जॅक स्वतःच्या घरातून बाहेर पडताच एफबीआयने त्याला अटक केली आहे. टेक्सीराने सर्वप्रथम गेमर्समध्ये लोकप्रिय एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म-डिस्कॉर्डचा चॅटरुम ‘ठग शेकर सेंट्रल’मध्ये या फाइल्स शेअर केल्या होत्या.

घरात मिळालेल्या अनेक गन्स
जॅकला गन्स बाळगण्याचा छंद होता. एफबीआयला तपासादरम्यान त्याच्या घरात अनेक गन्स आणि शस्त्रास्त्रs आढळून आली आहेत. डिस्कॉर्ड प्लॅटफॉर्मवर त्याने स्वतःचे नाव ‘ओरिजिनल गँगस्टर’ ठेवले होते. आपल्याकडे सरकारशी निगडित अशी गुपिते आहेत, जी लोकांसमोर उघड केली जाऊ शकत नसल्याचा दावा जॅकने एका चॅटरुममध्ये केला होता. जॅकने अनेक महिन्यांपर्यंत एक-एक करून हे दस्तऐवज शेअर केले होते.
संवेदनशील माहिती उघड
भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी जॅकला बोस्टन येथील न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. जॅक हा वायुदलात सायबर ट्रान्सपोर्ट विभागात कार्यरत होता. जॅकने या गोपनीय दस्तऐवजांवर नमूद माहिती अन्य कागदांवर लिहून घेतली होती. जॅकने हाय-प्रोफाइल राजकीय नेत्यांच्या हालचाली, त्यांची गुप्त ठिकाणं आणि सैन्याशी निगडित संवेदनशील माहिती उघड केली होती.
अमेरिकेची कोंडी
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान ब्रिटनचे विशेष सैन्यपथक युक्रेनमध्ये तैनात असल्याचा खुलासा जॅकने लीक केलेल्या दस्तऐवजांमधून झाला होता. तसेच अमेरिकेच्या 14 सैन्यतुकडय़ा युक्रेनमध्ये असल्याचे समोर आले होते. नाटोच्या अनेक सदस्य देशांच्या सैन्यतुकडय़ा देखील युक्रेनमध्ये असून यात लातव्हियाच्या 17 तुकडय़ा, फ्रान्सच्या 15 तर नेदरलँड्सची एक सैन्यतुकडी युक्रेनमध्ये असल्याचे या दस्तऐवजांमुळे समोर आले होते. याचबरोबर युद्धात युक्रेनच्या मर्यादाही या दस्तऐवजांमध्ये नमूद होत्या.









