नोकरी- रोजगार किंवा उद्योग-स्वयंरोजगार यापैकी कशाची निवड करावी हा प्रश्न अनेकांना विविध प्रकारे पडतो. शिक्षण पूर्ण करणारे नवागत असोत, शिक्षण प्रशिक्षणानंतर काही काळाने उद्योजकतेत येणारे लघू-उद्योजक अथवा प्रसंगी सेवा निवृत्तीनंतर आपल्या प्रदीर्घ अनुभव आणि कौशल्याच्या आधारे उद्योजकतेचा श्रीगणेशा करणारे नव-उद्योजक. या साऱ्यांना उद्योजकतेची सुरुवात करताना औपचारिक प्रशिक्षणाची गरज कुठल्या ना कुठल्या संदर्भात भासते.
उद्योजक मग ते वर नमूद केल्यापैकी कुठल्याही श्रेणी वा वर्गवारीतील असोत. त्यांच्या उद्योग-संकल्पनेला अधिक स्पष्टता व बळकटी देण्यासाठी उद्योजकतेची पूर्व तयारीही आवश्यक ठरते. या प्राथमिक तयारीमध्ये उद्योजकतेची मुलभूत मुद्दे, लघू उद्योगाची संकल्पना, नोकरी, रोजगाराचा चाकोरीबद्ध पर्याय सोडून लघू-उद्योगाच्या माध्यमातून स्वयंरोजगारासह उद्योजकता कां आणि कशी सुरू करावी व त्यानंतरच्या भविष्यकालीन योजना इ. चा प्रामुख्याने समावेश असणे अत्यावश्यक ठरते.
नव्याने उद्योजकतेची कास धरणाऱ्यांनी आपल्या प्रस्तावित लघू-उद्योगाशी निगडीत व आवश्यक अशा बाबी मुळातून समजून घेणे आवश्यक आहे. याची सुरुवात संबंधितांनी लघू-उद्योगाद्वारे स्वयंरोजगारच का? या मुलभूत प्रश्नाच्या तपशीलासह करायला हवी. त्याशिवाय लघू-उद्योगाची सुरुवात स्थापना त्यासाठी आवश्यक असणारे प्रयत्न, उद्योगाला प्रगतीसाठी गती देण्याकरिता करावयाचे नियोजन, आर्थिक पाठबळ वा योजना, उद्योग संकल्पना व त्याची मांडणी, धोरणात्मक निर्णय, व्यवसाय सर्वेक्षण, स्पर्धेची चाचपणी या बाबी अत्यावश्यक ठरतात.
वरील महत्त्वाच्या मुद्यांचा पडताळा घेण्यासाठी नव्याने उद्योजक क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी लघू उद्योग व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी प्राथमिक वा सुरुवातीच्या स्तरावर त्यांची उद्योग-संकल्पना व विविध पण महत्त्वाच्या बाबी म्हणून पुढील मुद्यांचा साधक-बाधक अभ्यास करायला हवा.
यामध्ये लघू उद्योगाचे संचालक-व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन, व्यवसाय नियोजन, विक्री-विपणन व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, कच्च्या मालाची उपलब्धता, शासकीय धोरण, विविध स्त्राsतांची उपलब्धता, कौशल्यपूर्ण कामगार, कर्मचारी उपलब्ध असणे, उद्योगाशी संबंधित व आवश्यक अशा तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन इ. चा विचार व पडताळा घेणे आवश्यक ठरते.
नोकरी- रोजगारासाठी अर्जदार-उमेदवारांची निवड करताना उमेदवारांची योग्यता-पात्रता पारखूनच त्यांची कंपनीकडून कर्मचारी म्हणून निवड केली जाते. त्यासाठी विविध प्रक्रिया-पद्धतींचा विशिष्ट पद्धतींचा अवलंब केला जातो. त्याचे विविध प्रकारे फायदे होत असल्याने एक सर्वमान्य व समावेशक बाब म्हणून पद्धती म्हणून उद्योजक म्हणून आपली कारकीर्द सुरू करताना आपली पारख करून घ्यायला हवी. यासाठी आपल्या स्वत:च्या मूल्यांकनाप्रमाणेच गरजेनुसार तज्ञ व तटस्थ व्यक्ती व विषयतज्ञांकरवी मूल्यांकन करवून घेणे. सुरुवातीच्या टप्प्यात व दीर्घकालीन स्वरुपात लाभदायी ठरतील.
स्वत:चा उद्योग- व्यवसाय सुरू असणाऱ्या वा नव्याने या क्षेत्रात ठरवून व विचारपूर्वक प्रवेश करू इच्छिणाऱ्यांमध्ये व्यवसाय क्षेत्र आणि उद्योग व्यवस्थापनासाठी आवश्यक असे गुणविशेष असायला हवेत.
जोखीम घेण्याची क्षमता व त्याचे निराकरण- मुळात नोकरी रोजगाराची चाकोरीबद्ध मानसिकता सोडून लघू उद्योगासह स्वयंरोजगार करायचा म्हणजे जोखीम ही असतेच. त्याशिवाय उद्योग व्यवसाय यासाठी आवश्यक अशा आर्थिक गुंतवणुकीमागे सुद्धा आर्थिक जोखीम असते. याशिवाय उद्योग सुरू करून यशस्वी होण्यासाठी जोखिम घेऊन जोखमीसह काम करणे व उद्योग-व्यवसायात यशस्वी होण्यासाठी विविध स्तरावरील व विविध प्रकारच्या जोखमीचा विचारपूर्वक अभ्यास करून त्यावर मात करणे यशस्वी उद्योजकांसाठी नितांत आवश्यक ठरते.
मोकळेपणाने विचार करणे- स्वत:चा व्यवसाय सुरू करताना मोकळ्या मनाने व मोकळेपणाने विचारच नव्हे तर त्यानुसार काम करणे ही एक मुलभूत व महत्त्वाची गरज ठरते. स्वयंरोजगार करून तो यशस्वी ठरण्यासाठी तुम्ही काय करता याच्याच जोडीला ते तुम्ही कसे करता यावर बरेच काही अवलंबून असते. त्याच जोडीला तुम्ही व्यवसायात असतांना आपल्या विचारांबद्दल इतरांचे मतविचार विचारात घ्यायलाच हवे. विचार व्यवहार यामधील हा मोकळेपणाच तुम्हाला उद्योगात यशाची वाट दाखविण्यासाठी मार्गदर्शक ठरते.
दूरगामी विचार पद्धती: असे म्हणतात की, शेती करताना एका पीक मोसमाचा, नोकरीत आर्थिक बाबीचा विचार पुरेसा ठरतो. मात्र स्वत:च्या उद्योगासाठी अल्पकालीन नव्हे तर दीर्घकालीन नियोजनासह विचार करायलाच हवा. कुठलाही उद्योग सुरू करून तो सातत्याने करून त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी दूरदर्शी स्वरुपाची व दूरगामी स्वरुपाची विचारपूर्ण कार्यपद्धती प्रत्येक नवउद्यमीने अमलात आणायला हवी.
व्यवसायातील नाविन्यपूर्ण कल्पना- स्वत:च्या जोरावर आपला लहान मोठ्या स्वरुपातील व्यवसाय सुरू करणे फारसे महत्त्वाचे नसते. महत्त्वाचे असते ते व्यावसायिक नाविन्यता व नवीन संकल्पना. पूर्वापार पद्धतीचा, ठराविक साच्याचा व्यवसाय सुरू केल्यास स्पर्धा ही अपरिहार्यपणे होणारच. या व्यावसायिक स्पर्धेला उद्योगाच्या सुरुवातीपासून मात देऊन कुणाला यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर व्यावसायिक संकल्पना असायला हव्यात. या नाविन्यामध्येच नव उद्योजगांच्या व्यावसायिक यशाची बिजे दडली असतात.
व्यवसायातील व्यवस्थापकीय नेतृत्व- उद्योजक वा व्यावसायिकांनी यशस्वी होण्यासाठी कार्यक्षम नेतृत्व असायलाच हवे. व्यवसायामध्ये उद्योजकाला व्यवस्थापन व नेतृत्व या दोन्ही भूमिका तेवढ्याच समर्थपणे पुऱ्या कराव्या लागतात. उद्योजक नेतृत्वाच्या संदर्भात विशेषत्वाने सांगायचे म्हणजे त्यांच्याकडे व्यावसायिक वृत्तीच्या जोडीलाच नेतृत्व, निर्णय क्षमता, इतरांना मार्गदर्शक वृत्ती, आवश्यक ते धाडस, पुढाकार घेण्याची वृत्ती, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनच नव्हे तर प्रोत्साहित करणे, संवाद प्रचूर नेतृत्व करणे या नेतृत्वशैली आहेत. याची खातरजमा करणे मोठे फायद्याचे ठरते.
व्यावसायिक आत्मविश्वास: उद्योग-व्यवसायात यशस्वी होण्यासाठी व्यक्तिगत स्तरावर आत्मविश्वासाची जोड महत्त्वाची ठरते. बरेच महत्त्वपूर्ण निर्णय, योजना, नियोजन यांचा अवलंब हा संबंधित उद्योजकाकडे स्वत: आणि स्वत:चे कार्यकर्तृत्व यावर आत्मविश्वास असेल तर निश्चितपणे यशस्वी होतो. आत्मविश्वासातूनच कार्यसिद्धी होते, निर्णयांची यशस्वी अंमलबजावणी होते. आपल्याशी व्यावसायिक संबंध ठेवणारे त्यामुळेच आपला आदर करतात व उद्योग-व्यवसायाला चालना मिळते.
वरील पैकी अधिकांश बाबींसाठी औपचारिक शैक्षणिक अभ्यासक्रम सर्वत्र उपलब्ध नसले तरी प्रयत्नपूर्वक प्रशिक्षण व मार्गदर्शनाद्वारे प्रचलित लघू उद्योजकांना अथवा ज्यांना उद्योग सुरू करायचा आहे. अशांना प्रत्यक्ष व व्यावहारिक अनौपचारिक प्रशिक्षण आणि अनुभवांसह आदान प्रदान फार महत्त्वाचे ठरते, हे याठिकाणी महत्त्वाचे आहे.
दत्तात्रय आंबुलकर








