अॅपलनेही घेतला वेग : चिनी कंपनी विवो 2024 पर्यंत सुरु करणार उत्पादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील स्मार्टफोन मार्केट विदेशी कंपन्यांना आकर्षित करत आहे. विदेशी कंपन्या भारतात आपला व्यवसाय वाढवत आहेत. अलीकडे अॅपल आयएनएसने भारतात दोन स्टोअर उघडण्याची घोषणा केली आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन अॅपलने मुंबई आणि दिल्लीत आपले स्टोअर उघडण्याची तयारी केली आहे. केवळ अॅपलच नाही तर चिनी स्मार्टफोन कंपनी विवो ग्रेटर नोयडा येथे आपला उत्पादन कारखाना उभारत आहे. 2024 च्या सुरुवातीला या प्रकल्पामधून उत्पादन सुरु करणार असल्याचे सांगितले जाते.
विवोने गुंतवणूक वाढवली
चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने सांगितले की, भारतात त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी या वर्षाच्या अखेरीस 1,100 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करणार आहे. कंपनीने सांगितले की, ग्रेटर नोएडामध्ये निर्माणाधीन युनिट 2024 च्या सुरुवातीला उत्पादन सुरू करेल. विवो इंडिया 2023 पर्यंत ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन्सच्या 10 लाखांहून अधिक युनिट्सची निर्यात करण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले.
विवोची नजर भारतीय बाजारपेठेवर
7,500 कोटी रुपयांच्या प्रस्तावित गुंतवणूक योजनेचा एक भाग म्हणून, विवो 2023 च्या अखेरीस पहिल्या टप्प्यात 3,500 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करेल. कंपनीने आधीच भारतात 2,400 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले आहे. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि भारताला जागतिक निर्यात केंद्र बनवण्यासाठी 2023 च्या अखेरीस अतिरिक्त 1,100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीला अपेक्षा आहे की ग्रेटर नोएडा येथे विवोच्या नवीन युनिटमध्ये उत्पादनाचे काम 2024 च्या सुरुवातीस सुरू होईल. त्याला अद्याप आवश्यक ती प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी आहे.
ग्रेटर नोएडा येथे स्थित, नवीन युनिट 169 एकरमध्ये पसरलेले आहे आणि सर्व टप्पे पूर्ण केल्यानंतर, भविष्यात दरवर्षी 12 कोटी स्मार्टफोन तयार करण्याची क्षमता असेल. कंपनीचे विद्यमान उत्पादन युनिटदेखील ग्रेटर नोएडा येथे आहे. भारतात विकला जाणारा प्रत्येक स्मार्टफोन ‘मेड इन इंडिया’ असण्यावर भर दिला जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
अॅपल सुरु करणार स्टोअर
अॅपल भारतात आपले स्टोअर उघडण्यासाठी प्रयत्न करत आहे. पहिली दोन दुकाने मुंबई आणि दिल्लीत सुरू होत आहेत. येत्या काही दिवसांत तुम्हाला देशातील आणखी अनेक शहरांमध्ये अॅपल स्टोअर्स पाहायला मिळतील.
अॅपलवर विश्वास ठेवा
तथापि, भारतीय बाजारपेठेत विस्तार करण्यात विवो एकटी नाही. अॅपलनेही येथे विस्तार सुरू केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतात अॅपलचे उत्पादन तीन पटीने वाढले आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, भारताने 7 अब्ज डॉलर किमतीच्या आयफोनचे उत्पादन केले, जे अॅपलच्या जागतिक उत्पादनाच्या 7 टक्के आहे. त्याच वेळी 2021 मध्ये ते केवळ 1 टक्के होते.









