लोणावळा : खरेदी केलेल्या जागेत बांधलेल्या पत्रा शेडची 8 अ उताऱयावर नोंद करण्यासाठी 12 हजार रुपयांची लाच मागत त्यापैकी 10 हजार रुपये रोख स्विकारताना आज कामशेत खडकाळा ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विलास तुकाराम काळे (वय 46) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने पकडले. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आईच्या नावे खरेदी केलेल्या जागेत बांधलेल्या पत्रा शेडची आईच्या नावे 8 अ उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी 12 हजार रुपये लाच मागत होते. या तक्रारीची शहनिशा करत आज सापळा लावण्यात आला होता. नोंदीसाठी दहा हजार रुपये ग्रामविकास अधिकारी यांनी स्विकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस उपआयुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कामशेत पोलीस अधिक तपास करत आहेत.









