धुळ प्रदूषणामुळे लोक हैराण, व्यापारी हवालदील, हालांना राहिला नाही पारावार
प्रतिनिधी / पणजी
’स्मार्ट सिटी’ बनविण्याच्या प्रयत्नात राजधानीची सध्या ’खाण सिटी’ सदृष्य अवस्था झाल्यामुळे जनतेच्या हालांना पारावार राहिलेला नाही. जी20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेली कामे संपविण्यासाठी दि. 15 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु 15 एप्रिल ठेपला तरी कामे पूर्णत्वास येत नसल्याने लोक हैराण झाले आहेत. सततच्या उत्खननामुळे सपूर्ण राजधानीत धुळीचे साम्राज्य पसरले आहे. भरीस वाहनांची गर्दी, त्यातून वारंवार निर्माण होणारे चक्का जाम, खोदलेल्या खड्ड्यांमध्ये वाहने कोसळण्याचे प्रकार, मलनिस्सारण-जलवाहिन्यांच्या तोडफोडीमुळे रस्ते चिखलमय-जलमय होण्याच्या घटना व त्यातून वाट काढताना वाहनचालकांना करावी लागणारी कसरत जीवावर बेतणारी ठरू लागली आहे. अशा या ख•sमय आणि जलमय रस्त्यांवरून वाट शोधत जाताना अनेक दुचाकीस्वार, खास करून महिला चालक अपघातग्रस्त होऊन जखमी झाले आहेत, आणि या सर्वांवर कहर म्हणजे ’असून अडचण’ ठरावा असा नवा कोरा अटल सेतू पूल. या सर्व प्रकारांमुळे सध्यातरी पणजीकरांचे जगणे असह्य बनले आहे. पणजी हे शहर मांडवी नदीच्या तिरावर वसलेले असल्याने मिरामारच्या दिशेने अरबी दर्यामार्गे येणारा सोसाट्याचा वारा या शहरात सतत घोंगावत असतो. याच वाऱ्याने सध्या शहरवासीयांच्या नाकेनऊ आणले आहे. त्यामुळे येथील व्यापारी, दुकानदार, हॉटेलचालक, भाजी-कडधान्य-कापड विक्रेते तर अक्षरश: हतबल झाले आहेत. खोदकामे संपता संपत नसल्याने सर्व व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याच्या तक्रारी आहेत. ’नको ते स्मार्ट शहर, आपली जुनी पणजीच बरी होती’, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.
पणजीत राहणे? नको रे बाबा!
यासंदर्भात मुळच्या सांखळी मतदारसंघातील पण गत कित्येक वर्षांपासून पणजीत स्थायिक झालेल्या एका व्यापाऱ्याने दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती, ’धुळीचे त्रास सहन होत नसल्यामुळे पणजीत आलो होतो, परंतु आज या शहराची चाललेली हेळसांड आणि करण्यात आलेली दैनावस्था पाहता आमचा खाण परिसरच सुद्धा परवडला’, असे खेदजनक उद्गार त्यांनी काढले. स्मार्टनेसच्या नावाखाली चाललेल्या कामांना मर्यादाच राहिलेली नाही. कितीतरी कंत्राटदार या भूमीवर आपापली कामे करत आहेत. परंतु त्यांच्यात समन्वय नसल्यामुळे एकाचे काम पूर्ण होताच दुसरा पुन्हा त्याच ठिकाणी उत्खनन आरंभत आहे. सरकारी छापखान्याच्या परिसरात असा प्रकार दिसून आला आहे. अशावेळी सौंदर्यीकरणाचा हा अतिरेक पणजीच्या मुळावर तर उठणार नाही ना? अशी भीतीयुक्त शंकाही सदर व्यापाऱ्याने व्यक्त केली.









