कोल्हापूर : बंटी पाटील हा सर्वात कपटी आणि मनोरुग्ण पाटील आहे. चारवेळा निवडणुका लढणार नाही म्हटला, पण त्यांचा खोटेपणा सिद्ध झाला. त्यांचा एक पेर सुद्धा राजाराम कारखान्याला येत नाही, त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
राजाराम सहकारी कारखाना निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाडिक एका सभेत बोलत होते. महाडिक म्हणाले, बंटी पाटील गावाभर मी 96 कुळी पाटील असल्याचे सांगत सुटतात. पण हे सांगण्याची गरज नाही, इथे सगळेच पाटील आहेत. पण हा पाटील मनोरुग्ण पाटील आहे. मंत्री असताना काश्मीरला ऊस पाहणीसाठी दौरे केले. पाहणी दौऱ्याच्या नावावर काय केले हे सगळ्यांना ठाऊक आहे. त्यांचा एक पेर सुद्धा राजाराम कारखान्याला येत नाही. त्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार नाही.
व्यासपीठावर बोलताना माजी. आ. महादेवराव महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, माझ्यासोबत दोघे असले तरी चालतील. महादेवराव महाडिक काय करू शकतो हे बावड्यात आलो होतो तेव्हा घरातून बाहेर आले असते तर कळले असते. घरात नसता तर गोष्ट वेगळी, पण त्यावेळी घरातून बाहेर आला नाही. महाडिकांनी सतेज पाटलाला आमदार केले, ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. विद्यापीठ निवडणुकीत शब्द दिला म्हणून मी माझ्या पुतण्याला थांबवून त्याला विजयी केले.
बंटी पाटील कोल्हापूरसाठी शाप
बंटी पाटील हा कोल्हापूर करासाठी शाप आहे. त्यांनी कोल्हापुराचा काय विकास केला? ज्या निगवेकरानी आंदोलन केले त्यांना तीन दिवस मारले, त्यांच्यावर देशद्रोहचे कलम लावले, असा आरोपही महाडिक यांनी केला.








