वृत्तसंस्था /कोलकाता
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी येथील ईडन गार्डन्स मैदानावर यजमान कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल. या स्पर्धेत कोलकाता संघाने यापूर्वी दोन सामने जिंकले असून आता हा संघ विजयाच्या हॅट्ट्रिकवर आपले लक्ष केंद्रित करेल. या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला पराभूत करून विजयी सलामी दिली होती. त्यानंतर कोलकाता संघाने दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सला पराभवाचा धक्का देत आपली विजयी घोडदौड कायम राखली होती. कोलकाता संघाने या स्पर्धेतील आपल्या मोहिमेला मोहालीतील मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध प्रारंभ केला होता. पण या सामन्यात त्यांना हार पत्करावी लागली होती. पण त्यानंतरच्या पुढील दोन सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला अनपेक्षित दोन खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची साथ मिळाल्याने त्यांनी आतापर्यंत सलग दोन विजय नोंदविले. बेंगळूर विरुद्धच्या सामन्यात कोलकाता संघातील वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुरची फलंदाजी संघाला विजयी करणारी ठरली. त्याने या सामन्यात आपल्या अष्टपैलू कामगिरीचे दर्शन घडविताना 29 चेंडूत 68 धावा झोडपल्याने त्यांना आपला पहिला विजय नोंदविता आला. कोलकाता संघाने बेंगळूर संघाविरुद्धचा सामना 81 धावांनी जिंकला होता. त्यानंतर या स्पर्धेतील विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सला नवोदित रिंकूच्या शानदार कामगिरीच्या जोरावर कोलकाता संघाने पराभूत केले होते. या नवोदित रिंकूने डावातील शेवटच्या षटकात 31 धावा झोडपत आपल्या संघाला 3 गडी राखून विजय मिळवून दिला होता. अहमदाबादमधील मोदी स्टेडियमवरील हा सामना निश्चितच प्रेक्षणीय ठरला होता. कर्णधार श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शकीब अल हसनच्या गैरहजेरीत यापूर्वी दोनवेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या कोलकाता संघाची कामगिरी खरोखरच कौतुकास्पद म्हणावी लागेल. कोलकाता संघाने या स्पर्धेत आतापर्यंत मिळविलेल्या दोन विजयामध्ये संघातील प्रमुख खेळाडूंचे योगदान नव्हते. आंद्रे रस्सेल आणि कर्णधार नितीश राणा हे सूर मिळविण्यासाठी झगडत असल्याचे चित्र पहावयास मिळते. तर शार्दुल ठाकुर आणि रिंकू यांची कामगिरी संघाला विजय मिळवून देणारी ठरली आहे. रस्सेलने पहिल्या सामन्यात 19 चेंडूत 35 धावा जमविल्या होत्या. पण त्यानंतर पुढील दोन सामन्यांमध्ये तो लवकर बाद झाला होता. या स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये कोलकाता संघाने आपल्या सलामीच्या जोडीमध्ये बदल केला असून आता शुक्रवारी होणाऱ्या हैद्राबादविरुद्धच्या सामन्यात गुरुबाजच्या जागी इंग्लंडच्या जेसन रॉयला सलामीला पाठविण्याची शक्यता आहे. शकीब अल हसनच्या जागी जेसन रॉयच्या संघात समावेश करण्यात आला आहे. बेंगळूर विरुद्धच्या सामन्यात अफगाणच्या गुरुबाजने अर्धशतक झळकविले होते.
अॅडेन मार्करमच्या नेतृत्वाखाली सन रायजर्स हैदराबाद संघामध्ये हॅरी ब्रुक, मयांक अगरवाल आणि क्लासेन हे प्रमुख खेळाडू आहेत. मात्र, हैदराबाद संघाच्या पहिल्या दोन सामन्यात हे वरील खेळाडू चमकू शकले नाहीत. दरम्यान, राहुल त्रिपाठी या फलंदाजाने पंजाब विरुद्धच्या सामन्यात 48 चेंडूत नाबाद 74 धावा जमवित आपल्या संघाला 8 गड्यांनी विजय मिळवून दिला होता. हैदराबाद संघाचा या स्पर्धेतील पहिला विजय आहे. हैदराबाद संघाला विंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लाराचे प्रमुख मार्गदर्शन लाभत आहे. या स्पर्धेसाठी 13.25 कोटी रुपयांच्या बोलीवर हैदराबाद संघाने ब्रुकला खरेदी केले आहे. पण गेल्या तीन सामन्यांमध्ये तो फलंदाजीत अपयशी ठरला आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि मयांक मार्कंडे हे या संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज आहेत. भुवनेश्वर कुमार आणि जान्सेन यांच्यावर नव्या चेंडूची जबाबदारी राहील. स्पर्धेच्या गुणतक्त्यात सध्या कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्या स्थानावर आहे. शुक्रवारचा सामना जिंकल्यास हा संघ आघाडीचे स्थान मिळवू शकेल.
कोलकाता नाईट रायडर्स- नितीश राणा (कर्णधार), गुरुबाज, वेंकटेश अय्यर, रस्सेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, फर्ग्युसन, उमेश यादव, टिम साउदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकूल रॉय, रिंकू सिंग, एन. जगदिशन, वैभव अरोरा, सुयश शर्मा, डेव्हिड विजे, कुलवंत खेजरोलिया, लिटॉन दास, मनदीपसिंग आणि जेसन रॉय.
सनरायजर्स हैद्राबाद- मार्करेम (कर्णधार), अब्दुल समाद, राहुल त्रिपाठी, फिलिप्स, अभिषेक शर्मा, जेनसेन, वॉशिंग्टन सुंदर, फरुकी, त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक, हॅरी ब्रुक, मयांक अगरवाल, क्लेसन, आदिल रशिद, मयांक मार्कंडे, व्ही. शर्मा, समर्थ व्यास, सनवीर सिंग, उपेंद्र यादव, मयांक दागर, नितीशकुमार रे•ाr, अकिल हुसेन आणि अनमोलप्रित सिंग.
सामन्याची वेळ- सायं. 7.30 वा.









