आमदार मायकल लोबो, पर्यटनमंत्री खंवटे यांच्यात वाक्युध्द
पणजी : कळंगुट ते बागा पट्ट्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर केवळ विरोधी आमदारच नव्हे तर सत्ताधारी आमदार आणि मंत्रीही गंभीर प्रŽ उपस्थित करत आहेत. स्थानिक आमदार मायकल लोबो यांच्या संतापानंतर काल बुधवारी या पर्यटन पट्ट्यातील वाढत्या अराजकतेसाठी स्थानिक पोलिसांना जबाबदार धरण्याची वेळ पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांच्यावर आली. खुद्द सरकारातीलच आमदार व मंत्री यांच्यात उत्तर गोव्यातील किनारपट्टीतील संघटित दलालीचा विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. किनारी भागात दलालांचे वाढते प्रमाण याला केवळ पोलीस कारणीभूत नसून, संपूर्ण यंत्रणा कारणीभूत असल्याचे आमदार लोबो यांनी सांगितले. यावर आळा घालायचा असेल तर संबंधित दलालांवर कठोर कारवाई करून त्यांना जबरदस्त दंड लागू करण्याची मागणी लोबो यांनी केली आहे.
पोलीस स्थानक झाले निष्क्रीय
लोबो यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, स्थानिक पोलिस ठाणे निकामी झाले असून पर्यटक व स्थानिकांना त्रास देणाऱ्या अवैध दलालांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. “या भागात दिवसेंदिवस बेकायदेशीर गोष्टी वाढत आहेत. स्थानिक महिलांना संध्याकाळी 7 नंतर घराबाहेर पडणे असुरक्षित वाटत आहे.” बेकायदेशीर दलाली ही राज्यातील पर्यटन वाढीसाठीची सर्वात मोठी समस्या असून यावर कारवाईद्वारे आळा घालण्याचे काम केवळ पोलीस विभाग करू शकतो. याबाबत आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी बोलणार आहे, असेही पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले.
पर्यटन विभागालाही दलालांवर कारवाई करण्याचे अधिकार : निधीन वालसन

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वालसन यांनी सांगितले की, पर्यटन विभागालाही बेकायदेशीर दलालांवर कारवाई करण्याचे अधिकार मिळाले आहेत. कळंगुटमध्ये गतवषी 400 दलालांचे बुकिंग झाले होते, तर गेल्या तीन महिन्यांत आणखी 100 जणांचे बुकिंग झाले आहे. दलालांवर कारवाई पोलीस आणि पर्यटन विभागाने मिळून करावी. या दलालीचा सामना करण्यासाठी आपण पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांचे सहकार्य घेणार आहे, असेही अधीक्षक वालसन यांनी सांगितले.









