तीन मुख्य चर्च, संग्रहालयासह वारसा स्थळाचे सुशोभिकरण
पणजी : पुढील आठवड्यात होणाऱ्या जी20 आंतरराष्ट्रीय परिषदेच्या तयारीचा भाग म्हणून जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता असलेल्या जुने गोवेतील चर्च परिसराचे सौंदर्यीकरण हाती घेतले आहे. त्यात खास करून 418 वर्षे जुनी असलेल्या बाँ जिझस बासिलिका चर्चचाही समावेश आहे. जी20 आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यातील अनेक वारसा स्थळे आणि अन्य वास्तुंचे सौंदर्यीकरण, रंगरंगोटी हाती घेतली आहे. जुने गोवे चर्च परिसराला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता असून तेथील बाँ जिझस बासिलिका चर्चसह सेंट कॅथेड्रल आणि 1661 मध्ये बांधलेल्या चर्च ऑफ सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी या वास्तुंची निवड केली आहे. त्याशिवाय तेथील म्युझियम ऑफ क्रिस्टीअन आर्टसह अन्य स्मारकांचीही पर्यटन सफरीसाठी निवड केली आहे. जी20 आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणारे प्रतिनिधी आणि त्यांचे जोडीदार यांच्या सहलीसाठी निवडलेल्या स्थळांमध्ये जुने गोवे परिसराचा समावेश आहे, अशी माहिती शिष्टाचार खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला. या सौंदर्यीकरणा अंतर्गत तीन मुख्य चर्च आणि एएसआय संग्रहालय आणि सभोवतालच्या परिसरातील कुंपणे, भिंती, आदींचे रंगकाम, नवीन वीज खांब आणि फिक्स्चर्स बसविणे, सार्वजनिक शौचालये-गटारव्यवस्था यांची अद्ययावत पद्धतीने स्वच्छता, दर्जा वाढवणे, यासारखी कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याशिवाय एएसआयच्या माध्यमातून परिसरात सर्व आवश्यक पायाभूत सुविधा वाढवल्या जात आहेत. यातील बहुतांश कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून त्यावर अखेरचा हात फिरवला जात असल्याचे सदर अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, जी20 परिषदेची गोव्यातील पहिली बैठक येत्या दि. 17 एप्रिल रोजी होणार असून तीन दिवशीय ही बैठक बांबोळी येथील एका रिसॉर्टमध्ये होणार आहे.









