वृत्तसंस्था/ माँटे कार्लो
सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचला माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या दुसऱया फेरीत विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्याने पात्रता फेरीतून आलेल्या रशियाच्या इव्हान गाखोव्हचा पराभव केला. याशिवाय अलेक्झांडर व्हेरेव्हने विजयी सुरुवात करताना अलेक्झांडर बुबलिकचा पराभव केला तर डिमिट्रोव्ह, सित्सिपस यांनीही विजय मिळविले.

जागतिक अग्रमानांकित जोकोविचला मार्चमध्ये झालेल्या दुबईतील स्पर्धेनंतर प्रथमच खेळताना येथील क्ले कोर्टवर झगडावे लागले. पण त्याने स्वतःला सावरत त्याने गाखोव्हचा 7-6 (7-5), 6-2 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली. त्याची पुढील लढत लॉरेन्झो मुसेटी किंवा लुका नार्डीशी होईल. अन्य एका सामन्यात अलेक्झांडर व्हेरेव्हने क्ले कोर्टवर झोकात पुनरागमन करताना कझाकच्या अलेक्झांडर बुबलिकवर 3-6, 6-2, 6-4 अशी मात करून दुसरी फेरी गाठली. नदालने ही स्पर्धा 11 वेळा जिंकली असून यावेळी दुखापतीमुळे त्याने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. द्वितीय मानांकित स्टेफानोस सित्सिपसने तिसरी फेरी गाठली. फ्रान्सच्या बेन्जामिन बॉन्झीविरुद्ध खेळतेवेळी तो 4-1 असा आघाडीवर असताना बॉन्झीने मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे माघार घेतली.
ग्रिगोर डिमिट्रोव्हने अमेरिकेच्या बेन शेल्टनचा 6-1, 3-6, 6-3 असा पराभव करून दुसऱया फेरीत स्थान मिळविले. त्याची पुढील लढत झेकच्या जिरी लेहेकाशी होईल. लेहेकाने फिनलँडच्या एमिल रुसुव्होरीवर 6-1, 7-5 अशी मात केली. लेहेकाचा हा क्ले कोर्टवरील पहिलाच विजय आहे.









