बिली जीन किंग चषक महिला टेनिस ः अंकिताची कामगिरी निर्णायक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अंकिता रैनाने एकेरी व दुहेरीत केलेल्या शानदार कामगिरीमुळे भारताने आशिया ओशेनिया गट एक बिली जीन किंग चषक महिला टेनिस स्पर्धेत थायलंडवर 2-1 अशा फरकाने मात केली. उझ्बेकमधील ताश्कंद येथे ही स्पर्धा सुरू आहे.
गट अ मधील या लढतीतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. रुतुजा भोसलेला लुकसिका कुमखुमकडून 6-2, 6-1 असा पराभव स्वीकारावा लागला. पण अनुभवी अंकिता रैनाने पिछाडीवर पडल्यानंतरही पीयांगटर्न प्लिपुएचवर 5-7, 6-1, 6-3 असा विजय मिळवित भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. दुहेरीच्या निर्णायक सामन्यात रैना व भोसले यांनीही पिछाडी भरून काढत कुमखुम व प्लिपुएच यांच्यावर 4-6, 6-3, 6-2 अशी मात करून भारताचा विजय निश्चित केला. भारताची पुढील लढत उझ्बेकविरुद्ध होणार आहे.









