ओटवणे / प्रतिनिधी
Fishermen in Aronda caught eight illegal sand mining workers!
आरोंदा येथील स्थानिक मच्छीमारानी आरोंदा शिपेतुवाडी येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या गोव्यातील चार होड्यासह आठ कामगारांना पकडले. ही धडक कारवाई बुधवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. या चारही होड्या महसूलच्या ताब्यात देण्यात आल्या असून त्यांच्यावर महसूल प्रशासनाच्यावतीने दंडात्मक कारवाई सुरू आहे.गोव्यातील या संबंधित वाळू माफियावर वेळोवेळी महसूल विभागाच्या वतीने कारवाई करूनही त्यांच्याकडून अवैद्य वाळू उपसा सुरूच आहे. तेरेखोल खाडीपात्रातील आरोंदा किरणपाणी येथे गोव्यातील वाळू माफियांकडून महाराष्ट्र हद्दीलगत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आठ दिवसापूर्वी महसूल विभागकडून अशा अवैध वाळू उपसा करणाऱ्यासा होड्यांवर कारवाई केली असतानाच बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास आरोंदा शिपेतुवाडी येथील स्थानिक मच्छिमार ग्रामस्थांनी गोव्यातील महाराष्ट्र किनाऱ्यालगत अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्या चार होड्या व आठ कामगारांना पकडून महसूल विभागच्या ताब्यात दिले. स्थानिक मच्छीमारांनी याची माहिती महसूल प्रशासनाला देताच भल्या सकाळीच नायब तहसिलदार मनोज मुसळे आपल्या पथका समवेत तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाळू उपसा करणाऱ्या या होड्यांचे पंचनामे करत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसाठी या कामगारांना सावंतवाडीत आणण्यात आले.
यावेळी सावंतवाडीचे नायब तहसीलदार मनोज मुसळे, आजगाव मंडळ अधिकारी विनायक कोदे, आरोंदा डी पी पास्ते, आजगाव तलाठी चंद्रगोपल नागराज, नेमळे तलाठी श्री पाटोळे, मडूरा तलाठी विजय कविटकर, मळेवाड तलाठी सचिन गोरे तलाठी मळेवाड, आरोंदा पोलीस पाटील जितेंद्र जाधव, मच्छीमार ग्रामस्थ नामदेव तारी, सिताराम तारी, अमित कोळंबकर, श्री चोडणकर, हेड कॉन्स्टेबल बाबुराव जाधव आदी उपस्थित होते.









