वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या पुरुष एकेरीच्या ताज्या मानांकन यादीत भारताच्या नवोदित प्रियांशू राजावतने 38 व्या स्थानावर झेप घेतली आहे. मानांकनमधील राजावतची ही सर्वोत्तम कामगिरी म्हणावी लागेल. मध्यप्रदेशच्या 21 वर्षीय प्रियांशू राजावतने अलीकडेच अर्लीन्स मास्टर्स सुपर 300 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकावताना डेन्मार्कच्या जोहानसेनचा 21-15, 19-21, 21-16 असा पराभव केला होता. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या पुरुष एकेरीच्या ताज्या मानांकन यादीत भारताचा लक्ष्य सेन 24 व्या, किदाम्बी श्रीकांत 23 व्या तर एच एस प्रणॉय आठव्या स्थानावर आहे. महिला एकेरीच्या मानांकन यादीत भारताची पी. व्ही. सिंधू 11 व्या तर सायना नेहवाल 31 व्या स्थानावर आहे. पुरुष दुहेरीच्या मानांकन यादीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज ही जोडी सहाव्या स्थानावर आहे.









