वृत्तसंस्था/ बेंगळूर
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आपल्या बळींचे शतक पूर्ण केले. सोमवारी लखनौ संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला.
हर्षल पटेलने लखनौ सुपरजायंट्सच्या या सामन्यात आपल्या पहिल्या दोन षटकात 35 धावा दिल्या. लखनौच्या स्टोईनिस आणि पुरन यांनी त्याच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी केली पण त्यानंतर हर्षल पटेलने आपल्या शेवटच्या दोन षटकात 13 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद केले. तरी पण पटेलला आपल्या संघाचा पराभव टाळता आला नाही. 2012 साली आयपीएल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या हर्षल पटेलने सुरुवातीला पूर्वाश्रमीच्या दिल्ली डेअरडेविल्स तर सध्याच्या दिल्ली कॅपिटल्सचे तसेच त्यानंतर आता आरसीबीचे प्रतिनिधीत्व करताना 81 सामन्यात 23.23 धावांच्या सरासरीने 101 गडी बाद केले आहेत. 27 धावात 5 ही हर्षल पटेलची सर्वोत्तम कामगिरी आहे. 2021 चा आयपीएल हंगाम त्याला सर्वात यशस्वी ठरला होता. त्याने त्या हंगामात 15 सामन्यात 32 गडी बाद केले होते. आयपीएल क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या पहिल्या 5 गोलंदाजांच्या यादीत विंडीजचा ड्वेन ब्रॅव्हो 183 बळीसह पहिल्या, यजुवेंद्र चहल 174 बळीसह दुसऱ्या, लंकेचा लसिथ मलिंगा 170 बळीसह तिसऱ्या, अमित मिश्रा 169 बळीसह चौथ्या तर रविचंद्रन अश्विन 161 बळीसह पाचव्या स्थानावर आहे.









