संयुक्त राष्ट्रसंघ / वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) या वित्तसंस्थेने भारताच्या 2023-2024 या आर्थिक वर्षाच्या विकासदरात घट सूचित केली आहे. या वर्षात हा विकासदर 5.9 टक्के राहील असे नवे अनुमान या संस्थेने प्रसिद्ध केले आहे. तीन महिन्यांपूर्वी या संस्थेने भारताचा विकास दर 6.1 टक्के राहील असे अनुमान व्यक्त केले होते. आता त्यात 0.2 टक्क्यांनी घट करण्यात आली आहे.
भारताच्या रिझर्व्ह बँकेने मात्र, भारताचा विकास दर 6.5 टक्के राहील असे अनुमान मांडले आहे. त्यापेक्षा नाणेनिधीचे अनुमान बरेच कमी आहे. अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या मतानुसार भारताचा विकासदर 6 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त राहील. आर्थिक वर्ष 2022-2023 मध्येही नाणेनिधीने भारताच्या विकासदराचे अनुमान कमी व्यक्त केले होते. हा दर 6.8 टक्के राहीले असे म्हटले होते. तथापि, त्या वर्षासाठी तो दर 7 टक्के राहिल्याचे स्पष्ट होत आहे.
वैश्विक दरातही घट
2023 च्या आर्थिक वर्षात जगाचा अर्थव्यवस्था विकासदर 2.8 टक्के असेल असे नवे अनुमान नाणेनिधीने व्यक्त केले आहे. आधी ते 3 टक्के होते. 2024 च्या आर्थिक वर्षात विश्वाचा विकासदर 3 टक्के राहील असे सांगण्यात आले आहे. त्या तुलनेत पाहिले तर भारताचा विकासदर जागतिक दराच्या जवळपास दुप्पट राहणार आहे, असे दिसून येत आहे. तुलनात्मक दृष्टीने भारताचा विकास दर समाधानकारक मानला पाहिजे, असेही तज्ञांचे मत आहे.









