कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक, चावला-बेहरेनडॉर्फ यांचे प्रत्येकी 3 बळी, वॉर्नर, पटेल यांची अर्धशतके वाया
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेतील येथील कोटला मैदानावर मंगळवारी झालेल्या शेवटच्या चेडूपर्यंतच्या रंगतदार ठरलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 6 गड्यांनी पराभव करत या स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला.
कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर मुंबई इंडियन्सने 20 षटकात 4 बाद 173 धावा जमवित आपला विजय शेवटच्या चेंडूवर नोंदवला.

मुंबई इंडियन्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी दिली. कर्णधार वॉर्नर आणि शॉ या सलामीच्या जोडीने 22 चेंडूत 33 धावांची भागीदारी केली असताना शोकेनने शॉला ग्रीनकरवी झेलबाद केले. त्याने 10 चेंडूत 3 चौकारासह 15 धावा जमवल्या. कर्णधार वॉर्नरला मनीष पांडेकडून बऱ्यापैकी साथ लाभली. पांडे आणि वॉर्नर यांनी 29 चेंडूत 43 धावांची भर घातली. पीयूष चावलाने पांडेला झेलबाद केले. त्याने 18 चेंडूत 5 चौकारासह 26 धावा जमवल्या. पांडे बाद झाल्यानंतर दिल्लीचे आणखी तीन फलंदाज केवळ 10 धावांत तंबूत परतले. मेरेडिथने यश धूलला 2 धावावर तर त्यानंतर चावलाने पॉवेलला 4 धावावर तसेच चावलाने दिल्लीला आणखी एक धक्का देताना ललित यादवचा 2 धावावर त्रिफळा उडवला. दिल्लीची स्थिती यावेळी 12.3 षटकात 5 बाद 98 अशी होती.

कर्णधार वॉर्नर आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांनी समयोचित फटकेबाजी करीत आपल्या संघाला सुस्थितीत नेताना सहाव्या गड्यासाठी 5.4 षटकात 67 धावा झोडपल्या. वॉर्नरच्या तुलनेत पटेलची फटकेबाजी अधिक आकर्षक आणि तुफानी होती. बेहरेनडॉर्फने अक्षर पटेलला अर्षद खानकडे झेल देण्यास भाग पाडले. पटेलने 25 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारासह 54 धावा फटकावताना 22 चेंडूत अर्धशतक नोंदवले.
दिल्लीच्या डावामध्ये बेहरेनडॉर्फने 19 वे षटक टाकले. या षटकातील पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेल झेलबाद झाला. त्यानंतर बेहरेनडॉर्फच्या या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर दिल्लीच्या पोरेलने लाँग ऑफच्या दिशेने चेंडू टोलवून 1 धाव घेतली. बेहरेनडॉर्फने आपल्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला मेरेडिथकरवी झेलबाद केले. वॉर्नरने 47 चेंडूत 6 चौकारासह 51 धावा झळकवल्या. बेहरेनडॉर्फच्या या षटकातील चौथ्या चेंडूवर कुलदीप यादव एकेरी धाव घेण्याच्या नादात वधेराच्या अचूक फेकीवर धावचित झाला. या षटकातील पाचव्या चेंडूवर दिल्ली कॅपिटल्सला एकही धाव मिळाली नाही पण या षटकातील शेवटच्या चेंडूवर बेहरेनडॉर्फने अभिषेक पोरेलला ग्रीनकरवी झेलबाद केले. दिल्लीच्या डावातील या 19 व्या षटकात बेहरेनडॉर्फने तीन गडी बाद केले तर एक फलंदाज धावचीत झाला.

दिल्ली कॅपिटल्सच्या 17 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर अक्षर पटेलने उत्तुंग मारलेला फटका सीमारेषेवर असलेल्या सूर्यकुमारच्या कपाळावर आदळला, त्यामुळे सूर्यकुमार जखमी झाला. तसेच त्याला झेल टिपता आला नाही आणि अक्षरला हा षटकार मिळाला. 19.4 षटकात दिल्ली कॅपिटल्सचा डाव 172 धावात आटोपला. दिल्लीच्या डावात 5 षटकार आणि 20 चौकार नोंदवले गेले. पाचही षटकार एकट्या अक्षर पटेलने मारले. कोटलाच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नसतानाही अक्षर पटेलने आक्रमक फटकेबाजी करत दिल्लीला सुस्थितीत नेले. अक्षरने केवळ 22 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. खेळपट्टी फलंदाजीस कठीण असल्याने वॉर्नरला अर्धशतकासाठी 43 चेंडू खेळावे लागले. मुंबईतर्फे बेहरेनडॉर्फने 23 धावात 3, मेरेडिथने 34 धावात 2, पीयूष चावलाने 22 धावात 3 तर शोकेनने 43 धावात एक गडी बाद केला.
रोहित शर्माचे अर्धशतक
प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन या सलामीच्या जोडीने 7.3 षटकात 71 धावांची भागीदारी केली. ईशान किशन डावातील 8 षटकात एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला. त्याने 26 चेंडूत 6 चौकारासह 31 धावा जमवल्या. रोहित शर्मा मात्र एका बाजूने सावध फलंदाजी करीत होता. अक्षर पटेलच्या फिरकीसमोर तो बाद होताना थोडक्यात बचावला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या तिलक वर्माने कर्णधार शर्माला चांगली साथ देताना दुसऱ्या गड्यासाठी 8.2 षटकात 68 धावांची भर घातल्याने मुंबई इंडियन्स पुन्हा विजयाच्या समीप पोहोचला. मुकेशकुमारने मुंबईच्या डावातील 16 व्या षटकात पाचव्या चेंडूवर तिलक वर्माला तर त्यानंतर सहाव्या चेंडूवर सूर्यकुमार यादवला खाते उघडण्यापूर्वीच बाद केल्याने मुंबईवर पुन्हा दडपण आले. तिलक वर्माने 29 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारासह 41 धावा फटकावल्या. मुस्तफिजूर रेहमानने रोहित शर्माला पोरेलकरवी झेलबाद केले. त्याने 45 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारासह 65 धावा तडकावल्या. 16.5 षटकात मुंबईने 4 बाद 143 धावा जमवल्या होत्या. इम्पॅक्ट खेळाडू टीम डेविड आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. डेविडने 11 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 13 तर ग्रीनने 8 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 17 धावा झळकवल्या. मुंबई इंडियन्सच्या डावामध्ये 10 षटकार आणि 14 चौकार नोंदवले गेले. दिल्लीतर्फे मुकेशकुमारने 2 तर मुस्तफिजूर रेहमानने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : दिल्ली कॅपिटल्स 19.4 षटकात सर्वबाद 172 (वॉर्नर 51, शॉ 15, मनीष पांडे 26, धूल 2, पॉवेल 4, ललित यादव 2, अक्षर पटेल 54, पोरेल 1, कुलदीप यादव 0, नॉर्त्जे 5, मुस्तफिजूर रेहमान नाबाद 1, अवांतर 11, बेहरेनडॉर्फ 3-23, चावला 3-22, मेरेडिथ 2-34, शोकेन 1-43).
मुंबई इंडियन्स 20 षटकात 4 बाद 173 (रोहित शर्मा 65, ईशान किशन 31, तिलक वर्मा 41, सूर्यकुमार यादव 0, टीम डेविड नाबाद 13, कॅमेरॉन ग्रीन नाबाद 17, अवांतर 6, मुकेशकुमार 2-30, मुस्ताफिजूर रेहमान 1-38).








