जयपूर / वृत्तसंस्था
राजस्थानात सचिन पायलट विरुद्ध अशोक गेहलोत असा संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. सचिन पायलट यांनी आपल्याच सरकारविरोधात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण मंगळवारी केले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मागच्या वसुंधरा राजे सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात कोणतीही कृती केलेली नाही. याचा निषेध म्हणून हे उपोषण आयोजित केले होते, असे पायलट यांनी नंतर स्पष्ट केले.
एकीकडे राहुल गांधी हे त्यांना शिक्षा झाल्यामुळे त्यांची खासदारकी गेल्यानंतर प्रथमच केरळमधील वायनाड येथे जाहीर कार्यक्रम करत असताना राजस्थानात सचिन पायलट यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात बंडाचा झेंडा फडकाविला आहे. यामुळे राहुल गांधीच्या नेतृत्वाच्या क्षमतेविषयी शंका उत्पन्न होत आहेत, असे तज्ञांचे मत आहे. सचिन पायलट यांचा संयम आता संपुष्टात आला असून ते केव्हाही काँगेस पक्षातून बाहेर पडू शकतात, असेही बोलले जात आहे.
नवा पक्ष काढणार ?
काँगेसमधून बाहेर पडले तरी पायलट भाजपमध्ये जाणार नाहीत, हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर स्वतःचा नवा प्रादेशिक पक्ष काढणे हा उपाय आहे. हा पर्याय ते अवलंबिण्याची दाट शक्यता आहे, अशी राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसे झाल्यास या वर्षाच्या अखेरीस राजस्थानमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीत वेगळी समीकरणे निर्माण होऊ शकतात.
चर्चा करण्यास नकार
गेहलोत आणि पायलट यांच्यातील मतभेद दूर करण्याची जबाबदारी राजस्थानचे काँगेस प्रभारी सुखजिंदर सिंग यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आपण गेले अनेक महिने पायलट यांच्याशीं चर्चा करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र, ते चर्चेसाठी उत्सुक दिसत नाहीत, असे सिंग यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्रीपदाची आशा
पायलट यांना राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. तशी मनीषा त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून विविध मार्गांनी पक्षश्रेष्ठींच्या दृष्टीस आणून दिली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी काही आपल्या गटातील काही आमदारांना राज्याबाहेर नेऊन स्वपक्षाविरोधात बंड करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो यशस्वी झाला नव्हता. अखेर त्यांना माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे नंतरच्या काळात मुख्यमंत्री गेहलोत गटाने त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न अधिक गतीमान केला होता.









